पोलिसाच्या निषेधार्थ मोर्चा
By Admin | Updated: July 26, 2014 00:34 IST2014-07-25T23:29:56+5:302014-07-26T00:34:23+5:30
पाथर्डी : भगवान सेनेचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ दगडखैर यांना पोलीस निरीक्षकाकडून अपमानास्पद वागणूक मिळून जेलमध्ये ठेवण्याविषयी दिलेल्या धमकीच्या निषेधार्थ
पोलिसाच्या निषेधार्थ मोर्चा
पाथर्डी : भगवान सेनेचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ दगडखैर यांना पोलीस निरीक्षकाकडून अपमानास्पद वागणूक मिळून जेलमध्ये ठेवण्याविषयी दिलेल्या धमकीच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्त्यानी शुक्रवारी पाथर्डी पोलीस ठाण्यावर मोर्चा नेऊन या घटनेचा निषेध केला. व आठवडाभरात या निरीक्षकाच्या बदलीची मागणी केली.
पाथर्डी पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुभाष अनमुलवार यांनी सुमारे १५ दिवसापूर्वी अपशब्दाने अपमानित करुन जेलमध्ये ठेवण्याची धमकी दिली, अशी दगडखैर यांची तक्रार आहे. या घटनेच्या निषेधार्थ तहसील कार्यालयावर सवाद्य मोर्चा नेण्यात आला.मोर्चा तहसील कार्यालयावर गेल्यानंतर पोलिसांनी तो गेटवरच अडविला.
मोर्चात भारतीय टायगर फोर्सचे प्रा.किसन चव्हाण, ज्येष्ठ नेते अशोकराव गर्जे, उद्योगपती भीमराव फुंदे, माजी नगराध्यक्ष दिनकर पालवे, अॅड.विठ्ठलराव बडे, रवींद्र म्हस्के, गोकुळ दौड, सतीश पालवे, वंजारी युवा सेनेचे प्रदेशाध्यक्ष धनराज गुट्टे, राजाभाऊ दगडखैर आदीसह युवा कार्यकर्ते सहभागी झाले होते.
यावेळी अशोक गर्जे म्हणाले, अन्यायाच्या विरोधात लढणारा तालुका म्हणून पाथर्डी तालुक्याकडे पाहिले जाते. शहरात अतिक्रमणे काढण्याचा उद्योग जो पोलीस अधिकाऱ्यांनी केला त्यातून हप्ते कसे वाढतील असे पाहिले. सामान्य माणसांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांनी करू नये. अन्याय करणाऱ्याला सळो की पळो करून सोडल्याशिवाय रहाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
यापुढे असे प्रकार सहन केले जाणार नाहीत, असा इशारा भारतीय टायगर फोर्सचे प्रा.किसन चव्हाण यांनी दिला. बहुतेक वक्त्यांनी पोलीस ठाण्यात चालणारे उद्योग कथन करीत पोलीस निरीक्षकाच्या बदलीची मागणी केली. उपविभागीय पोलीस अधीक्षक संतोष पाटील यांनी दोषींवर योग्य ती कारवाई करून वरिष्ठांपर्यत तुमच्या भावना कळवितो, असे आश्वासन दिले. मोर्चेकऱ्यांच्यावतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
(तालुका प्रतिनिधी)
नाहक त्रास नको
पोलीस निरीक्षकाची तातडीने बदली न केल्यास गप्प बसणार नाही. आम्ही स्व. गोपीनाथ मुंडे यांचे सैनिक आहोत. आम्हाला नाहक त्रास देवू नका. अन्यथा आम्ही शांत बसणार नाही असा इशारा दिला.
-धनराज गुट्टे,
वंजारी युवा सेनेचे,प्रदेशाध्यक्ष