चारा पाण्यासाठी जनावरांसह मोर्चा
By Admin | Updated: July 1, 2014 00:14 IST2014-06-30T23:20:45+5:302014-07-01T00:14:21+5:30
अकोले: ‘चारा व पाणी’ मागणीसाठी मुथाळणे ग्रामस्थांचा गाय बैल गुरांसह भर उन्हात सोमवारी दुपारी दोन वाजता अकोले तहसील कार्यालयावर मोर्चा धडकला.
चारा पाण्यासाठी जनावरांसह मोर्चा
अकोले: ‘चारा व पाणी’ मागणीसाठी मुथाळणे ग्रामस्थांचा गाय बैल गुरांसह भर उन्हात सोमवारी दुपारी दोन वाजता अकोले तहसील कार्यालयावर मोर्चा धडकला. तहसील गेटवर पोलीस व आंदोलक यांच्यात संघर्ष झाल्यानंतर तहसिलदार व गटविकास अधिकारी यांनी आंदोलकांसोबत चर्चा केली. ठोस आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
जनावरांना चारा द्या! पाणी द्या! अशा घोषणा देत नायकरवाडी, पागीरवाडीसह मुथाळणे गावच्या आदिवासी शेतकऱ्यांनी पाळीव जनावरांसह मोर्चा काढला. सात ते आठ किलोमिटरचा पल्ला पार करीत गर्दणी घाटातून हा मोर्चा तहसिल कचेरीवर धडकला. मोर्चात गावठी डांग जातीची जणावरे बहुसंख्येने होती.
हा कसला आला विकास, जनावरांना व माणसांना प्यायला पाणी नाही? मुक्या जनावरांनी करायच काय? दरवर्षीच चारा व पाण्यासाठी मुथाळणे, समशेरपुरसह आढळा खोऱ्याला संघर्ष करावा लागत आहे. तालुक्याला लाल दिवा असून नसल्यासारखा आहे. आधिकारी मुजोर झालेत, निवेदने अन् कागदी ठराव करत बसू नका? लवकरात लवकर पाणी व चारा द्या? कायदा हातात घ्यायला लावू नका, असा सज्जड इशारा वयोवृध्द शेतकरी मुरलीधर जोरवर यांनी दिला. बाळू सदगीर व बबन सदगीर यांनी मुथाळणे गावात जनावरांसाठी छावणी सुरु न झाल्यास तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करु, असा इशारा दिला.
मच्छिंद्र धुमाळ, शांताराम संगारे, केरु सदगीर, शंकर सदगीर, भास्कर होलगीर, दुंदा गोडे यांची भाषणे झाली. तहसिलदार चंद्रशेखर देशमुख, गटविकास अधिकारी दिलिप रुपवते, पोलिस उपनिरीक्षक रविंद्र बर्डे यांनी आंदोलनास सामोरे जात निवेदन स्वीकारले.
आंदोलकांशी तहसीलदार यांचे दालनात चर्चा केली. पिण्याच्या पाण्याचा टँकर खेप वाढवून देऊ, चाऱ्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करु, अशा ठोस आश्वासनानंतर तुर्त आंदोलन मागे घेण्यात आले.
(तालुका प्रतिनिधी)