भिंगार : भिंगार शहरातील विविध नागरी समस्यांबाबत शुक्रवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने छावणी परिषद कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला़ यावेळी संतप्त महिलांनी कार्यालयातच ठिय्यात देत प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली़ यावेळी अधिकाऱ्यांना त्यांची नियोजित बैठक थांबवून महिलांचे म्हणणे ऐकून घ्यावे लागले़ नगर शहरातील भिंगार उपनगरातील शुक्रवार बाजारतळ येथून निघालेल्या मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते़ मोर्चा छावणी परिषद कार्यालयाजवळ आला तेव्हा बोर्ड सदस्यांची बैठक सुरु होती. छावणी परिषदेचे अध्यक्ष तथा ब्रिगेडियर विक्रांत नायर यांनी मोचार्ला सामोरे जात निवेदन स्वीकारले़ यावेळी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी शहरातील समस्यांचा पाढा त्यांच्या समोर वाचला. नायर यांनी प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले़ त्यानंतर मोर्चातील नागरिक माघारी फिरले, परंतु पाण्याच्या प्रश्नावरून संतप्त झालेल्या महिलांनी तिथेच ठिय्या दिला. अधिकाऱ्यांना पुन्हा बोलवा़ आम्हाला त्याच्यासमोर प्रश्न मांडायचे आहेत. जोपर्यंत ते येत नाहीत, तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाहीय, असा पवित्रा महिलांनी घेतला. यावेळी महिलांनी कार्यालयात सुरू असलेल्या बैठकीत जाण्याचा प्रयत्न केला, मात्र महिला पोलिसांनी त्यांना रोखले. पोलिसांनी मुख्य कार्यकारी अधिकारी लोटे यांच्याशी संवाद साधत त्यांना बैठकीतून बाहेर बोलावले. महिलांनी पाणी, स्वच्छतेचा प्रश्न उपस्थित केला़ लोटे यांनी हे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले़ सुभाषचंद्र पाटील, संजय सपकाळ यांनी यावेळी प्रश्न मांडले़ यावेळी छावणी परिषदचे उपाध्यक्ष मुसाद्दिक सय्यद, राष्ट्रवादीचे सुरेश बनसोडे, मतिन सय्यद, संजय सपकाळ, सुदाम गांधले, संभाजी भिंगारदिवे, विलास तोरडमल, हनिफ जरीवाला, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाषचंद्र पाटील, महेश झोडगे, मारुती पवार आदी उपस्थित होते़ (वार्ताहर)
छावणी परिषदेवर मोर्चा
By admin | Updated: September 10, 2016 00:23 IST