धारदार शस्त्रांसह चौघांना अटक

By Admin | Updated: September 2, 2014 23:31 IST2014-09-02T23:31:36+5:302014-09-02T23:31:36+5:30

अहमदनगर : दरोड्याच्या तयारीत असलेल्या चौघा जणांच्या टोळीला पोलीस उपअधीक्षक वाय.डी. पाटील यांच्या विशेष पथकाने मंगळवारी पहाटे अटक केली.

Fourth arrest with sharp weapons | धारदार शस्त्रांसह चौघांना अटक

धारदार शस्त्रांसह चौघांना अटक

अहमदनगर : दरोड्याच्या तयारीत असलेल्या चौघा जणांच्या टोळीला पोलीस उपअधीक्षक वाय.डी. पाटील यांच्या विशेष पथकाने मंगळवारी पहाटे अटक केली. अंधाराचा फायदा घेऊन दोघे जण पळाले असून त्यांची नावे निष्पन्न झाली आहेत. चौघांकडे धारधार हत्यारे सापडल्याने ते दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्याविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक लखमी गौतम, उपअधीक्षक वाय.डी. पाटील यांच्या आदेशाने शहरात सध्या पोलिसांची रात्रं-दिवस गस्त सुरू आहे. तोफखाना पोलिसांची गस्त सुरू असताना ही टोळी आढळून आली. मंगळवारी पहाटे साडेचार वाजता सावेडी नाका येथील जुन्या सावेडी बसस्थानकाजवळील शौचालयाच्या आडोशाला काही इसम बसल्याचे पोलिसांना दिसले. याचा पोलिसांना संशय आला. यावेळी तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक लक्ष्मण काळे व त्यांचे सहकारी यांनी थोड्या अंतरावर जावून सरकारी वाहन उभे केले आणि रस्त्याने पायी येत असताना ते आपापसात काहीतरी कुजबुज करीत असल्याचे लक्षात आले. यावेळी पोलिसांनी त्यांच्यावर अचानक झडप घातली. यावेळी चारजण जागेवरच पकडले. अंधाराचा फायदा घेऊन दोघेजण सीना नदीच्या दिशेने पळून जाण्यात यशस्वी ठरले. त्या दोघांचा पोलिसांनी शोध घेतला, मात्र ते फरार झाले.
चार जणांना पकडले त्यांची नावे अशी आहेत. श्रावण महादू माळी (वय २६, रा. तीनकुनिया, ता. जि. अलाहाबाद), राजेश संतोष फुलमाळी (वय २८, रा. सुकी, भोपाळ), ओमप्रकाश रबी काळे (वय १८, रा. धनगरवस्ती, लिंपनगाव, ता. श्रीगोंदा), अजय राजू ठाकूर (वय १७,रा. सुकी समरिया, भोपाळ). या चौघांनी पळून गेलेल्या दोघांची नावे लखन शंकर काळे (रा. तीनकुनिया, जि. अलाहाबाद, हल्ली रा. जामखेड) आणि राजू उर्फ रम्या गौड (रा. पाखरी, जामखेड)अशी आहेत, असे सांगितले.
वाय.डी. पाटील यांच्या पथकामध्ये निरीक्षक लक्ष्मण काळे यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक एम.एम. काकडे, पोलीस उपनिरीक्षक एम.बी. भोसले, पोलीस नाईक संदीप पवार, विश्वास गाजरे, दत्तात्रय हिंगडे, शरद गायकवाड, दथरथ थोरात, होमगार्ड साईनाथ साळुंखे यांचा समावेश होता. (प्रतिनिधी)
चौघांची पोलिसांनी अंगझडती घेतली असता चौघांकडे वेगवेगळी शस्त्रे सापडली. एकाकडे जांबिया (चाकू), दुसऱ्याकडे स्टीलचे फायटर लॅस्टिक आणि लाल रंगाची मिरची पूड, तिसऱ्याकडे एक गिलवर, चौथ्याकडे लोखंडी कटावणी अशी हत्यारे आढळून आली. त्यांच्याकडे शस्त्रे असल्याने ते दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक एम.एम. काकडे तपास करीत आहेत.

Web Title: Fourth arrest with sharp weapons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.