चौदा जणांना सश्रम कारावास

By Admin | Updated: October 19, 2016 01:02 IST2016-10-19T00:40:40+5:302016-10-19T01:02:28+5:30

कर्जत : सामायिक रस्त्याच्या कारणावरून झालेल्या मारहाणप्रकरणी मंगळवारी कर्जत न्यायालयाने चौदा जणांना प्रत्येकी दोन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.

Fourteen people are given rigorous imprisonment | चौदा जणांना सश्रम कारावास

चौदा जणांना सश्रम कारावास


कर्जत : सामायिक रस्त्याच्या कारणावरून झालेल्या मारहाणप्रकरणी मंगळवारी कर्जत न्यायालयाने चौदा जणांना प्रत्येकी दोन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. ही घटना २०११ मध्ये कर्जत तालुक्यातील बाभूळगाव खालसा येथे घडली होती.
११ जानेवारी २०११ रोजी सायंकाळी बाभूळगाव शिवारातील शेतातील येण्या-जाण्याच्या सामायिक रस्त्यावरून उसाचा भरलेला ट्रॅक्टर जाऊ न दिल्यामुळे दोन्ही गटांत वाद झाला होता. यावेळी आपापसांत गज, कोयता, चैन, काठ्या यासारख्या घातक हत्यारांनी मारहाण केली होती. यात दोन्ही गटांच्या लोकांना कमी-अधिक प्रमाणात गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या होत्या. याप्रकरणी दोन्ही गटांनी परस्परविरोधी फिर्यादी दिल्या होत्या. या खटल्याची सुनावणी कर्जत येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर झाली. फिर्यादी, जखमी, साक्षीदार, डॉक्टर, तपासाधिकारी यांचे जबाब ग्राह्य धरून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी अविनाश माळवदे यांनी आरोपींना वेगवेगळ्या कलमांखाली सहा महिने ते दोन वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा सुनावली.
या सर्व शिक्षा एकत्रित भोगावयाच्या आहेत. त्यामुळे या गुन्ह्यातील चौदा जणांना प्रत्येकी एकूण दोन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे. (तालुका प्रतिनिधी)
आरोपींची नावे
साहेबराव पुराणे, गंगाधर पुराणे, सीताराम पुराणे, पंकज पुराणे, सुभाष पुराणे, तुषार पुराणे, राजेंद्र पुराणे, नामदेव पुराणे, सुनील पुराणे, संदीप पुराणे, गणेश पुराणे, सतीश पुराणे, नितीन पुराणे,छाया पुराणे. या खटल्यात सरकार पक्षातर्फे विशेष सहकारी वकील अ‍ॅड. गहिनीनाथ नेवसे यांनी काम पाहिले.

Web Title: Fourteen people are given rigorous imprisonment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.