अकोलेतून मंत्र्यांना पाठविली चार हजार पत्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:20 IST2021-09-13T04:20:16+5:302021-09-13T04:20:16+5:30
अहमदनगर : दुधाला एमआरपीप्रमाणे दर मिळावा, यासह इतर मागण्यांसाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने अकोले तालुक्यातून चार पत्रे ...

अकोलेतून मंत्र्यांना पाठविली चार हजार पत्रे
अहमदनगर : दुधाला एमआरपीप्रमाणे दर मिळावा, यासह इतर मागण्यांसाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने अकोले तालुक्यातून चार पत्रे दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांना पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती शेतकरी संघर्ष समितीचे राज्य समन्वयक डॉ. अजित नवले यांनी दिली.
शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने दूध उत्पादकांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी लेटर टू डेअरी मिनिस्टर हे अभिनव आंदोलन हाती घेण्यात आले आहे. समितीच्या या आंदोलनाला राज्यभरातून प्रतिसाद मिळत आहे. एकट्या अकोले तालुक्यातून मुख्यमंत्र्यांसह दुग्धविकास मंत्र्यांना चार हजार पत्र पाठवून दुूध उत्पादकांच्या मागण्यांची माहिती देण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातील संगमनेर, नेवासा तालुक्यासह पुणे, नाशिक, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, सांगली, औरंगाबाद जिल्ह्यातूनदेखील पत्र पाठविण्यात आलेली आहेत. याशिवाय विधानसभा व विधान परिषदेच्या सदस्यांनाही साडेचार पत्र पाठविण्यात आली आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे दुधाचे खरेदीदार आता काही प्रमाणात सुधारत आहेत. मात्र असे असले तरी दूध व्यवसायातील अस्थिरता दूध व्यावसायिकांना पुन्हा अडचणीत आणू शकते. दूध व्यवसायातील अस्थिरता लक्षात घेता संघर्ष समितीने आपल्या धोरणात्मक मागण्यांसाठीचा संघर्ष नेटाने सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच संघर्ष समितीच्या राज्य समन्वय समितीची बैठक घेऊन आंदोलनाची दिशा जाहीर केली जाणार आहे, असेही नवले यांनी म्हटले आहे.
....
लॉकडाऊनपूर्वीचा भाव द्या
कोरोनाच्या लॉकडाऊनपूर्वी दुधाला प्रतिलीटर ३५ रुपये दर मिळत होता. लॉकडाऊन काळात हा दर २० रुपयांवर आला होता. आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेल्या घडामोडी शेतकरी संघटनेच्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर दूध दरात वाढ होऊन सध्या २७-२८ रुपये भाव मिळत आहे. दुधाचे संघटीतरित्या भाव पाडले जात आहेत. मात्र, त्याला काही प्रमाणात आळा बसलेला आहे. दुधाला ३५ रुपयांपेक्षा अधिक भाव मिळालाच पाहिजे, यासाठी संघटनेचा लढा सुरुच राहणार असल्याचे शेतकरी संघर्ष समितीचे राज्य समन्वय डॉ. अजित नवले यांनी सांगितले.