व्यापाऱ्यांना लुटणारे चौघे गजाआड

By Admin | Updated: May 26, 2016 23:58 IST2016-05-26T23:54:47+5:302016-05-26T23:58:56+5:30

अहमदनगर : मुंबई येथील सराफा व्यापाऱ्यांकडील ३१ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लुटणाऱ्या चौघांंना कोतवाली पोलिसांनी पंढरपूर येथे गजाआड केले.

Four looters | व्यापाऱ्यांना लुटणारे चौघे गजाआड

व्यापाऱ्यांना लुटणारे चौघे गजाआड

अहमदनगर : मुंबई येथील सराफा व्यापाऱ्यांकडील ३१ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लुटणाऱ्या चौघांंना कोतवाली पोलिसांनी पंढरपूर येथे गजाआड केले. कोतवाली पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविल्याने २४ तासात चोरट्यांना गजाआड करण्यात यश मिळाले. मात्र या चोरीमागील मास्टरमार्इंड वेगळाच असण्याची शक्यता व्यक्त झाली आहे.
मुंबई येथील क्रिएटिव्ह ज्वेलरी या फर्मचे सेल्समन (व्यापारी) जगदीश मदन पुरोहित आणि धीरज जैन यांनी मंगळवारी दिवसभर सराफा बाजारात सोन्याच्या दागिन्यांची मार्केटिंग केली. त्यानंतर बसस्थानकाकडून बुरुडगाव रोडवरील एका हॉटेलमध्ये रात्री साडेआठ वाजता पायी जाताना चार ते पाच जणांनी त्यांच्या डोळ््यात मिरची पूड टाकून त्यांच्याकडील ३१ लाख रुपये किमतीचे दागिने बळजबरीने हिसकावले आणि ते पसार झाले. पुरोहित यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि २४ तासात गुन्ह्याचा छडा लावला. पोलीस उपअधीक्षक बजरंग बनसोडे, निरीक्षक सोमनाथ मालकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी तातडीने गुन्ह्याचा तपास हाती घेतला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि नागरिकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे चोरट्यांचा शोध लागला. परिसरातील टॉवरवरून चोरट्यांचे मोबाईल क्रमांक आणि त्यांचे लोकेशन पंढरपूरमध्ये असल्याचे आढळून आले. त्यानुसार पथकाने गुरुवारी सकाळी चौघांना पंढरपूरमधून अटक केली.
मैनोद्दिन ईलियास शेख, तौफिक ईलियास शेख, पंकज विठ्ठल गायकवाड, महेश सुभाष भिंगारे (रा.पंढरपूर, जि. सोलापूर) अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत. त्यांच्याकडून चोरी गेलेले सर्व ३१ लाख रुपयांचे सोने हस्तगत करण्यात आले आहे, अशी माहिती उपअधीक्षक बजरंग बनसोडे यांनी पत्रकारांना दिली. सहायक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण, संदीप पाटील, उपनिरीक्षक गजानन करेवाड, पोलीस नाईक रमेश गांगर्डे, नितीन उगलमुगले, सुधीर खाडे, अभिजित अरकल, गोरे, लोंढे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
(प्रतिनिधी)
चोरटे ज्या कारमध्ये पळून गेले, त्या कारची नंबर प्लेट बनावट होती. कारमध्ये बसण्याआधी त्यांनी कारची प्लेट बदलली. चोरटे कारमध्ये बसून पळून गेल्याचे चित्रीकरण डॉ. बन्सी शिंदे हॉस्पिटलच्या वेब कॅमेऱ्यात कैद झाले होते. चोरट्यांच्या शोधासाठी पोलिसांना स्थानिक नागरिकांची मोठी मदत झाली. गुन्ह्यातील कारसह चालक अद्याप फरार आहे. दरम्यान या गुन्ह्यात पोलिसांची संशयाची सुई वेगळ््याच दोघांवर असल्याचे समजते.

Web Title: Four looters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.