चार तास मृतदेह शेवगाव पोलीस ठाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:21 IST2021-03-21T04:21:04+5:302021-03-21T04:21:04+5:30

शेवगाव : तालुक्यातील ठाकूर पिंपळगाव येथे शेतीच्या वादातून झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्यांच्या विरोधात गुन्हा ...

Four hours at Shevgaon police station | चार तास मृतदेह शेवगाव पोलीस ठाण्यात

चार तास मृतदेह शेवगाव पोलीस ठाण्यात

शेवगाव : तालुक्यातील ठाकूर पिंपळगाव येथे शेतीच्या वादातून झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी नातेवाइकांनी त्या व्यक्तीचा मृतदेह चार तास थेट शेवगाव पोलीस ठाण्यात आणून ठेवल्याची घटना शनिवारी (दि.२०) घडली. पोलिसांनी संबंधितांवर गुन्हा दाखल केल्यानंतर रात्री पावणेआठच्या सुमारास मृतदेह अंत्यसंस्कारासाठी ठाकूर पिंपळगाव येथे नातेवाईक घेऊन गेले.

हरिभाऊ पांडुरंग बदडे (वय ४०, रा. ठाकूर पिंपळगाव), असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

मृत व्यक्तीच्या नातेवाइकांनी दिलेली माहिती अशी, ठाकूर पिंपळगाव येथे शेतीच्या वादातून हरिभाऊ पांडुरंग बदडे यांना त्यांच्या नात्यातीलच काही व्यक्तींनी शुक्रवारी (दि.१२) मारहाण केली होती. त्यानंतर चर्चेतून प्रकरण मिटले होते. शुक्रवारी (दि.१९) सायंकाळी हरिभाऊ हे घरी येत असताना त्यांना पुन्हा मारहाण करण्यात आली. त्यानंतर ते घरी येऊन झोपले. सकाळी त्यांना घरातील लोकांनी उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते उठले नाहीत. त्यावेळी त्यांचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर शेवगाव येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास मृतदेह आणण्यात आला. दुपारी चारच्या सुमारास मृत हरिभाऊ यांना मारहाण करणाऱ्या संबंधित व्यक्तींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी नातेवाइकांनी मृतदेह पोलीस ठाण्यात आणून ठेवला होता.

दरम्यान, शेवगाव पोलीस ठाण्यात तणावाचे वातावरण निर्माण झाल्यावर पाथर्डीचे पोलीस निरीक्षक रणजित ढेरे हेही कर्मचाऱ्यांसह शेवगाव येथे दाखल झाले होते.

या प्रकरणातील मृत व्यक्तीचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला आहे. त्या अहवालात त्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांनी दिली.

----

सायंकाळी शेवगाव पोलीस ठाण्यात कलम ३०४ नुसार संबंधित व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाेलीस ठाण्यातील तो मृतदेह नातेवाईक घेऊन गेले आहेत.

-प्रभाकर पाटील,

पोलीस निरीक्षक, शेवगाव

Web Title: Four hours at Shevgaon police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.