सुप्यातील चार गुंडांवर तडीपारी
By Admin | Updated: July 4, 2016 23:47 IST2016-07-04T23:40:29+5:302016-07-04T23:47:43+5:30
सुपा : खून, दरोडा, अपहरण अशा विविध गुन्ह्यातील सुपा येथील तिघे व हंगा येथील एकजण अशा चार जणांना सुपा पोलिसांनी नगर जिल्ह्यातून तडीपार केले आहे़

सुप्यातील चार गुंडांवर तडीपारी
सुपा : खून, दरोडा, अपहरण अशा विविध गुन्ह्यातील सुपा येथील तिघे व हंगा येथील एकजण अशा चार जणांना सुपा पोलिसांनी नगर जिल्ह्यातून तडीपार केले आहे़ त्यामुळे नेहमीच थाटात वावरणाऱ्या गुन्हेगारांवर सुपा पोलिसांचा वचक निर्माण झाला आहे़
तडीपार केलेल्या कानिफ उर्फ कान्हा राधाकिसन पोपळघट याच्याविरोधात पारनेर व सुपा पोलीस ठाण्यात खून, जबरी चोरी, दरोडा, अपहरण, शिवीगाळ, दमदाटी असे विविध १३ गुन्हे दाखल आहेत़ राहुल अशोक पवार याच्या विरोधात अपहरण दरोडा, दंगल, रस्तेलूट, दमदाटी असे ११ गुन्हे दाखल आहेत़ रामदास दिलीप पवार याच्याविरोधात घरफोडी, दंगल, रस्तेलूट, असे पाच गुन्हे दाखल आहेत़ हे तिघेही सुपा येथील रहिवासी असून, कानिफ पोपळघट व राहुल पवार यांंना १ वर्षासाठी तर रामदास पवार याला दोन वर्षांसाठी नगर जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे़ हंगा येथील प्रमोद तात्याबा गिरी याच्याविरोधात घरफोडी, दंगल, रस्तेलूट, शिवीगाळ असे गुन्हे दाखल असून, त्याला एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे़
या सराईत गुन्हेगारांना जिल्ह्यातून तडीपार करण्यात यावे, यासाठी पोलीस निरीक्षक विवेकानंद वाखारे यांनी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविला होता़ तर नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक शामकांत सोमवंशी यांनी या प्रस्तावाबाबत पाठपुरावा केला़ या गुन्हेगारांना तडीपार करण्याचा प्रस्ताव पारित होताच सोमवंशी यांनी या गुन्हेगारांना तडीपार धाडले़ हे सर्व गुन्हेगार सध्या बीड जिल्ह्याच्या हद्दीत असल्याचे पोलिसांनी सांगितले़