कारभारणीला सरपंच करण्यासाठी पतीराजांकडून मोर्चेबांधणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:35 IST2021-02-05T06:35:08+5:302021-02-05T06:35:08+5:30

सुपा : पारनेर तालुक्यातील सुपा ग्रामपंचायतीसह जवळच्या वाळवणे, पळवे खुर्द, गटेवाडी गावच्या सरपंचपदाची सूत्रे महिलांच्या हाती येणार आहेत. यातून ...

Formation of a front by Patiraja to make the caretaker Sarpanch | कारभारणीला सरपंच करण्यासाठी पतीराजांकडून मोर्चेबांधणी

कारभारणीला सरपंच करण्यासाठी पतीराजांकडून मोर्चेबांधणी

सुपा : पारनेर तालुक्यातील सुपा ग्रामपंचायतीसह जवळच्या वाळवणे, पळवे खुर्द, गटेवाडी गावच्या सरपंचपदाची सूत्रे महिलांच्या हाती येणार आहेत. यातून कारभारणीला सरपंचपद मिळवून देण्यासाठी त्यांच्या पतीराजांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. सुप्यात सत्तेसाठी बहुमत मिळविलेल्या गटातून पाच महिला सदस्या ग्रामपंचायतीत निवडून आलेल्या आहेत. यातून कोणाला संधी मिळणार याकडे लक्ष लागले आहे.

सुप्यानजिक तीन किलोमीटरवरील वाळवणे गावच्या ग्रामपंचायतीचे सरपंचपद महिला राखीव असून तेथील बहुमत प्राप्त गटाचे नेतृत्व भैरवनाथ देवस्थान विश्वस्त समितीचे अध्यक्ष सचिन पठारे, तालुका सहकारी दूध संघाचे संचालक उद्योजक सुरेश थोरात यांनी केले. या गटातून विजय मिळविलेल्या जयश्री सचिन पठारे यांच्या सरपंचपदासाठीचा मार्ग मोकळा असल्याने त्यांना संधी मिळणार आहे. पळवे खुर्द येथे महिला राखीव जागेसाठी मावळते सरपंच नानाभाऊ गाडीलकर यांच्या पत्नी सविता गाडीलकर यांचे नाव आघाडीवर आहे. नानाभाऊ गाडीलकर, माजी जि. प. सदस्य शिवाजीराव गाडीलकर, रामदास तरटे, संजय तरटे व अन्य कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखालील विजयी मंडळाला बहुमत मिळाले. त्यामुळे सविता गाडीलकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकते.

गटेवाडी येथे सत्तांतर करण्यात यशस्वी झालेल्या तालुका दूध संघाच्या व्यवस्थापक ज्ञानदेव गट यांच्या मंडळातील महिला सदस्याला सरपंचपदाची संधी मिळणार असून गट सुचवतील तेच या खुर्चीत विराजमान होणार आहेत. आपधूपमध्ये माजी सरपंच सुभाष गवळी, माजी उपसरपंच नामदेव गवळी, उत्तमराव गवळी यांच्या मंडळाने बहुमत मिळविल्याने सर्वसाधारण गटासाठी अजिंक्य गवळी किंवा मीनाक्षी गवळी या दोघांपैकी एकाला संधी देण्यावर एकमत होऊ शकते.

निवडणुकीत प्रत्येकाने उमेदवारी मिळविणे ते आपली कारभारीणीला विजयी करणे यासाठी केलेली धडपड अनुभवली आहे. आता विजय मिळाला. परंतु, सत्तेच्या खुर्चीत पत्नीला बसविण्यासाठी आडाखे बांधणे, त्यासाठी आपणच कसे योग्य आहोत, यासाठी राजकीय प्रतिष्ठापणाला लावली जात आहे.

-----

सुप्यात सर्वाधिक चुरस..

सुपा येथे मनीषा रोकडे, शुभांगी पवार, पल्लवी काळे, निकिता पवार व सुरेखा पवार यांचा बहुमत प्राप्त मंडळात समावेश असून यात कुणाला संधी द्यायची हे ठरणार आहे. येथे सरपंचपदासाठी सर्वाधिक चुरस आहे. आमदार निलेश लंके यांचे मार्गदर्शन, माजी सरपंच राजू शेख, राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची टीम यांचे विजयात योगदान असल्याने सर्वानुमते सरपंचपदाचे दावेदार ठरतील. असे असले तरी आमदार लंके यांचा शब्द मोलाचा ठरणार आहे.

Web Title: Formation of a front by Patiraja to make the caretaker Sarpanch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.