परप्रांतीय कामगार गेले, स्थानिकांनी फिरविली पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:21 IST2021-04-22T04:21:45+5:302021-04-22T04:21:45+5:30
अहमदनगर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधांमुळे परप्रांतीय कामगार गावी निघून गेले असून, स्थानिकांनी पाठ फिरविली आहे. ...

परप्रांतीय कामगार गेले, स्थानिकांनी फिरविली पाठ
अहमदनगर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधांमुळे परप्रांतीय कामगार गावी निघून गेले असून, स्थानिकांनी पाठ फिरविली आहे. त्यामुळे उत्पादनात घट झाल्याने उद्योजकांना हातावर हात धरून बसण्याची वेळ आली आहे. मोठ्या कंपन्या वगळता इतर छोटे कारखाने बंद झाले आहेत.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत परप्रांतीय कामगार गावी निघून गेले होते. रुग्णसंख्या कमी झाल्याने कामगार पुन्हा कामावर हजर झाले. परंतु, हे प्रमाण कमी होते. कारखाने पूर्ववत होत असतानाच दुसरी लाट येऊन धडकली. शासनाने कडक निर्बंध लागू केले. लॉकडाऊनच्या भीतीने परप्रांतीय कामगार गावाकडे निघून गेले आहेत. उत्पादनात कपात करून कारखाने सुरू होते. परंतु, ऑक्सिजनचा पुरवठा पूर्णपणे बंद झाला. त्यामुळे अनेक कारखान्यांनी उत्पादन थांबविले आहे. निर्यात करणाऱ्या बोटावर मोजण्याइतक्या कंपन्या सुरू असल्याने त्यांना सुट्या भागांचा पुरवठा करणाऱ्या कंपन्या सुरू आहेत. परंतु, कामगार मिळत नाहीत. परप्रांतीय कामगार निघून गेल्याने स्थनिक कामगारांवरच उद्योजकांची भिस्त आहे. परंतु, कोरोनाच्या भीतीने हे कामगारही गावाकडे निघून गेले असून, ते परत येण्यास तयार नाहीत. कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. उपचारासाठी बेड शिल्लक नाहीत. ऑक्सिजन मिळत नाही. त्यामुळे आपली शेती केलेलीच बरी, अशी अनेकांची भावना झाली आहे. त्यात कच्च्या मालाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. जास्तीचे पैसे मोजूनही कच्चा माल मिळत नाही आणि मिळालाच तर आणण्याची सोय नाही. त्यामुळे उद्योजकांनी उत्पादन कमी केले असून, बोटांवर मोजण्या इतक्याच कामगारांवर काम सुरू केले आहे.
....
कोरोनामुळे दुसऱ्यांदा कंपन्या बंद ठेवण्याची वेळ आली असून, २५ कंपन्या बंद आहेत. परप्रांतीय कामगार गावी निघून गेलेले आहेत. स्थानिक कामगार भीतीमुळे येत नाहीत. इतरही अनेक अडचणी आहेत.
- राजेंद्र कटारिया, अध्यक्ष आमी
....
- काेरोनामुळे भीतीचे वातावरण आहे. कामगार येत नाहीत. जे आहेत त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेऊन उत्पादन कसेबसे सुरू आहे. कच्चा माल मिळत नाही. ऑक्सिजनचा पुरवठा बंद आहे. उद्योजकांकडे असलेला ऑक्सिजन रुग्णालयांना दिला जात आहे. उद्योजकांनी उत्पादन कमी केले.
- मिलिंद कुलकर्णी, उद्योजक