फुलांचे मळे बहरले
By Admin | Updated: September 28, 2016 00:37 IST2016-09-28T00:06:49+5:302016-09-28T00:37:05+5:30
योगेश गुंड , अहमदनगर दसरा-दिवाळी या सणासुदीच्या दिवसात झेंडू,शेवंती यासारख्या फुलांना मोठी मागणी असते. सध्या या फुलांच्या लागवडीचे मुख्य आगार असणाऱ्या अकोळनेर (ता.नगर)

फुलांचे मळे बहरले
योगेश गुंड , अहमदनगर
दसरा-दिवाळी या सणासुदीच्या दिवसात झेंडू,शेवंती यासारख्या फुलांना मोठी मागणी असते. सध्या या फुलांच्या लागवडीचे मुख्य आगार असणाऱ्या अकोळनेर (ता.नगर) मध्ये झेंडू व शेवंतीचे मळे बहरले आहेत. एकट्या अकोळनेर गावात दुष्काळजन्य परिस्थिती असूनही शेतकऱ्यांनी टँंकरने विकतचे पाणी देऊन फूल शेतीची वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा टिकवली आहे. सध्या फुलांना समाधानकारक भाव नसला तरी सणासुदीत तो वाढेल अशी फूल उत्पादक शेतकऱ्यांना आशा आहे.
सणासुदीचे दिवस म्हटले की, आनंद हा जसा दरवळत असतो तसा त्या आनंदात भर घालण्यासाठी फुलांचा सुगंधही दरवळत असतो. मात्र गेल्या वर्षी पावसाने हुलकावणी दिल्याने फूलशेती अडचणीत आली. यावेळी मात्र नगर तालुक्यात पावसाचे प्रमाण बरे असल्याने फूलशेतीची लागवड एकट्या अकोळनेर गावातच ५०० एकर क्षेत्रात झाली आहे. शेजारील सारोळा कासार, भोरवाडी, कामरगाव, सुपा या भागातही फूलशेतीला प्राधान्य दिले जाते. मात्र सर्वात जास्त उत्पादन व लागवड अकोळनेर गावातच होते. शेवंतीची लागवड मार्च-एप्रिल महिन्यात झाल्याने तेव्हा दुष्काळजन्य स्थिती होती. तरीही फूल उत्पादक शेतकऱ्यांंनी फूलशेतीची परंपरा टिकवण्यासाठी पदरमोड करून विकतचे पाणी देवून शेवंती जागवली आहे.
अकोळनेरमध्ये रतलाम, राजा, बंगलोर, पिवळी, बिजली अशा खूप जाती आहेत.
या सर्व जातीची लागवड अकोळनेरमध्ये झालेली आहे. तसेच झेंडूची लागवड पावसाळ्यात झाली असून त्यात इंडिका, तुळजापुरी, छोटा, पिवळा-लाल झेंडूची लागवड करण्यात आली आहे. याबरोबरच अस्टर, गलांडा, गुलाब, जरबेरा यासारख्या रंगीबेरंगी फुलांचे उत्पादन अकोळनेरमध्ये घेतले जाते.