सीना नदीला पूर, रस्त्यांची दाणादाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:44 IST2021-09-02T04:44:57+5:302021-09-02T04:44:57+5:30
अहमदनगर : गेल्या काही दिवसांपासून विश्रांती दिलेल्या पावसाने सोमवारी सायंकाळी विजेच्या कडकडाटासह हजेरी लावली. तालुक्यातील ससेवाडी, जेऊर भागात ...

सीना नदीला पूर, रस्त्यांची दाणादाण
अहमदनगर : गेल्या काही दिवसांपासून विश्रांती दिलेल्या पावसाने सोमवारी सायंकाळी विजेच्या कडकडाटासह हजेरी लावली. तालुक्यातील ससेवाडी, जेऊर भागात अतिवृष्टी झाल्याने सीना नदीला पूर आला होता. नगर-कल्याण रोडवरील पूल पाण्याखाली गेल्याने मध्यरात्रीपासून या मार्गावरील वाहतूक ठप्प होती. दुपारनंतर पूर ओसरल्याने पोलीस बंदोबस्तात वाहतूक सुरळीत करण्यात आली.
शहरातून वाहत असलेल्या सीना नदीचे उगमस्थान असलेल्या जेऊर व ससेवाडी भागात अतिवृष्टी झाली. त्यामुळे सीना नदी दुथडी भरून वाहू लागली. नगर - औरंगाबाद महामार्गावरील पूल पाण्याखाली गेला होता. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक मंगळवारी दुपारपर्यंत ठप्प होती. तसेच नगर-कल्याण रोडवरील पुलाची उंची कमी असल्याने हा पूल मध्यरात्री पाण्याखाली गेला होता. त्यामुळे एक रुग्णवाहिका पुलावर अडकली होती. तेथील नागरिकांनी महापालिकेच्या अग्निशमन विभागाशी संपर्क केला. कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत रुग्णवाहिका काढून दिली. नागपूर औद्याेगिक वसाहत, बोल्हेगाव, सावेडी गावठाण परिसरात पूर परिस्थिती होती. बोल्हेगाव व नागापूर येथील रस्ते वाहतुकीसाठी बंद होते. याशिवाय सारसनगर येथील भिंगारनाला, बोरुडेमळा भागातील रस्त्यांत मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. मध्यवर्ती शहरातील रस्त्यांची कामे अर्धवट अवस्थेत असल्याने रस्त्यांना नाल्याचे स्वरूप आले होते. सावेडी उपनगरातील गुलमोहर रोड, पाइपलाइन रोड, कुष्ठधाम, भिस्तबाग महालाकडे जाणारा रस्ता, गावडेमळा आदी भागातील रस्त्यांत पाण्याची डबकी साचली होती. त्यातच पथदिवे बंद असल्याने अंधार होता. नालेगाव येथील वसाहतींमधील नागरिकांच्या घरात पाणी घुसले होते.
.....
आयुक्तांकडून पाहणी
महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी सीना नदीच्या पूरपरिस्थितीची ठिकठिकाणी जाऊन पाहणी केली. कल्याण रोडवरील पुलाची पाहणी करून आयुक्तांनी काटवन खंडोबा येथील पुलाचीही पाहणी केली. त्यानंतर सारसनगर, बोरुडेमळा, यशोदानगर, बोल्हेगाव आदी भागातील रस्त्यांची पाहणी करण्यात आली. या वेळी शहर अभियंता सुरेश इथापे, शाखा अभियंता श्रीकांत निंबाळकर आदी उपस्थित होते.
.........
शहर अंधारात
पावसामुळे शहरासह उपनगरातील रस्त्यांत पडलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साचले होते. त्यातच बहुतांश रस्त्यांवरील पथदिवे बंद होते. त्यामुळे सर्वत्र अंधार होता. पाण्याचा अंदाज न आल्याने अनेक दुचाकीस्वार पाण्यात घसरून पडले. त्यामुळे अनेक जण जखमी झाले असून, नागरिकांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
........
रस्ते पाण्याखाली
शहरासह उपनगरातील रस्ते पावसामुळे पाण्याखाली गेले होते. मध्यवर्ती शहरासह सावेडी, बोल्हगाव, नागापूर, सावेडी गावठाण, भुतकरवाडी, नालेगाव, शिवाजीनगर, बुरुडगाव, कानडेमळा, मुकुंदनगर, निर्मलनगर, लेखानगर, सूर्यानगर, गावडेमळा, कॉटेल कॉर्नर, भिस्तबाग चौक परिसर, नित्यसेवा सोसायटी, वसंत टेकडी, श्रीरामचौक, श्रमिकनगर आदी भागांतील रस्त्यांमध्ये ठिकठिकाणी पाणी साचले होते. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली.
.....
सूचना फोटो
३१ नगर सीना २ : नगर शहरातील काटवन खंडोबा परिसरातील सीना नदीवरील पूल पाण्याखाली गेला. त्यामुळे काही वेळ या भागातील नागरिकांचा नगर शहराशी संपर्क तुटला होता.
३१ नगर खड्डे १ : सोमवारी रात्री नगर शहरात झालेल्या पावसाने रस्त्यांची दाणादाण उडाली असून, सर्वच रस्त्यांवर असे खड्डे पडले आहेत.
(छायाचित्र - साजिद शेख)
३१ नगर खड्डे २