सट्ट्याचा फास आवळतोय
By Admin | Updated: April 16, 2016 23:12 IST2016-04-16T22:55:41+5:302016-04-16T23:12:58+5:30
अहमदनगर : क्रिकेटवर लागणाऱ्या सट्ट्याला सर्वमान्यता मिळवून देण्यासाठी अनेक राजकीय नेत्यांचे पंटर बुकींचे हस्तक झाले आहेत़ नगर शहरातील अनेक हॉटेल,

सट्ट्याचा फास आवळतोय
कोट्यवधींची उलाढाल : शाळकरी मुले, तरुण अडकले सट्टाबाजारात
अहमदनगर : क्रिकेटवर लागणाऱ्या सट्ट्याला सर्वमान्यता मिळवून देण्यासाठी अनेक राजकीय नेत्यांचे पंटर बुकींचे हस्तक झाले आहेत़ नगर शहरातील अनेक हॉटेल, टपऱ्या सट्ट्याची केंद्र झाली आहेत़ तर काही पंटरांनी सट्ट्यासाठी संगणक, मोबाईलची यंत्रणाच उभी केली आहे़ ही यंत्रणा तरुणांभोवती सट्ट्याचा विळखा आवळत आहे़
खेळाचा आनंद लुटण्याबरोबरच कमाईचे आमिष दाखवून तरुणांना सट्टेबाजारात ओढले जाते़ राजकीय कार्यकर्ते आणि व्यावसायिकांपुरता मर्यादित असलेल्या या सट्टाबाजाराने शाळकरी, महाविद्यालयीन तरुणांना विळखा घातला आहे़ आयपीएलचा फिवर रंगू लागला आहे़ त्यामुळे सट्ट्यातील उलाढालही प्रचंड वाढली आहे़ नगर जिल्ह्यात एका दिवसात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे़
नगर शहरातील माळीवाडा आणि सावेडीत सट्टाबाजाराचे केंद्र आहे़ बुकींनी दिलेले रेट हस्तक आपल्या पंटरांमार्फत सट्टेबाजांपर्यंत पोहोचवितात़ शनिवारी हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात मॅच झाली़ टॉस झाल्यानंतर हैदराबादने बॅटींग घेतली़ काही क्षणातच कोलकाता नाईट रायडर्ससाठी १ रुपयाला ९० पैसे तर हैदराबादला ८० पैसे भाव जाहीर करण्यात आला़
मॅच सुरु झाली की प्रत्येक टप्प्यावर आणि अखेरच्या ओव्हरमध्ये बॉल, विकेट, बाऊंड्रीला सट्ट्याचे रेट बदलत राहतात़ शहरातील बहुतांशी हॉटेलमध्ये मोठ्या स्क्रीनवर मॅच पाहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे़ अनेकजण या हॉटेलांमध्ये बसून तर काही मोबाईलवरुन सट्टा लावतात़
(प्रतिनिधी)
अशी चालते यंत्रणा
संगणकावर इंटरनेटच्या माध्यमातून सट्ट्याचे भाव अपडेटस् केले जातात़ हे भाव मोबाईलवरुन सट्टा लावणाऱ्यांपर्यंत पोहोचविले जातात़ हस्तक आपल्या पंटरांना काही टक्केवारी देऊन (त्याला खायचे पैसे म्हणतात) सट्टा घेतात़ आपली टक्केवारी राखून पंटर सट्टा घेऊन हस्तकांपर्यंत पोहोचवितात़ हस्तक बुकींच्या लॉगिनवर आॅनलाईन हा सट्टा नोंदवितात़
पंटर घेतात अंगावर खेळ
काही पंटर हस्तकाकडे खेळ न देता अंगावर खेळ घेतात़ म्हणजे सट्टा लावणाऱ्याने पंटरकडे १ हजार रुपये लावले तर पंटर हस्तकाकडे हा सट्टा लावत नाही़ सट्टा लावणारा जर हरला तर हे पैसे पंटरच्या खिशात जातात़ जर एखादा संघ जिंकण्याची दाट शक्यता असेल तर विरुद्ध मॅचवर लावलेला सट्टा पंटर अंगावरच घेतात़अशावेळी हस्तकही पंटरला ‘खाऊन घे’चा सल्ला देतात़तर बुकींग घेतानाच काहीजण ‘खाण्या’साठी १० पैसे कमी रेट सांगतात़
काय आहे सेशन ?
मॅचदरम्यान सेशनवर सट्टा लावणारेही भरपूर आहेत़ प्रथम बॅटींग करणारा संघ किती धावा बनवू शकतो, यावर लावल्या जाणाऱ्या सट्ट्याला सट्टेबाजारात सेशन असे संबोधले जाते़ सेशन दहा ओव्हर आणि पाच ओव्हरमध्येही घेतला जातो़ अखेरच्या पाच ओव्हरमध्ये सेशनचे रेट वारंवार बदलत राहतात़ विकेट, बाऊंड्री यानुसार हे रेट कमी-अधिक होत असतात़
४चांगल्या खेळाडूंवरही सट्टा खेळला जातो़ शनिवारी कोलकाता नाईट रायडर्स व हैदराबाद यांच्यातील मॅच दरम्यान प्रारंभी सेशन ९० पैसे होता़ जी टीम जिंकण्याची शक्यता अधिक ती टीम फेवरिट असते़ फेवरिट टीमसाठी बुकींकडून कमी भाव दिला जातो़
आयपीएलच्या सामन्यावर सट्टा लावला जात असल्याचे आढळून आल्यास त्वरित कारवाई करण्याचे आदेश सर्व पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत़ याबाबत जिल्ह्यातील सर्व ठिकाणी बारकाईने सट्टेबाजारावर नजर ठेवण्यात येत आहे़ याबाबत कोणाला माहिती असल्यास त्यांनी त्वरित संबंधित पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा़
-डॉ़ सौरभ त्रिपाठी,
जिल्हा पोलीस अधीक्षक