कोपरगाव : शहरात विविध चोऱ्यांचे सत्र सुरू आहे. त्यातच मंगळवार व बुधवार या दोन दिवसात कोपरगाव शहरात चोरीच्या पाच वेगवेळ्या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मंगळवारी (दि.७) रात्री शहरातील बसस्थानक परिसरातील दीपक पाठक यांच्या पानटपरीचे अज्ञात चोरट्याने कुलूप तोडून व टपरीचा पत्रा वाकवून चोरी करण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. त्यानंतर पूनम थिएटर समोरील श्री गणेश फरसाण या टपरीचे कुलूप तोडून एका वजनकाट्यासह चिल्लर असा एकूण साडेतीन हजारांचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर असलेल्या मनोज आवारे यांच्या चहाच्या टपरीतून एक गॅस टाकी व शेगडी अज्ञात चोरट्याने लंपास केली आहे. जुने सायन्स कॉलेज येथे सुरू असलेल्या नगरपालिकेच्या उर्दू शाळेतून २० हजार रुपये किमतीचे इन्व्हर्टर चोरट्यांनी लंपास केले आहे. तर शहरातील नगर-मनमाड महामार्गावर शीतल हॉटेलसमोर बुधवारी (दि.८ ) सकाळी उभ्या असलेल्या एक स्कुटीवर ठेवलेली पर्स, त्याच्यात असलेले दोन मोबाईल व रोख रक्कम असा २५ हजारांचा ऐवज लंपास केला आहे.