पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेसाठी नगर जिल्ह्यातील पाच तालुक्यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 17:16 IST2017-11-22T17:08:18+5:302017-11-22T17:16:39+5:30
पाणी फाऊंडेशनच्या वतीने घेण्यात येणा-या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत यंदा प्रथमच नगर जिल्ह्याला संधी मिळाली असून, नगर जिल्ह्यातील पाच तालुक्यांची या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.

पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेसाठी नगर जिल्ह्यातील पाच तालुक्यांची निवड
अहमदनगर : पाणी फाऊंडेशनच्या वतीने घेण्यात येणा-या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत यंदा प्रथमच नगर जिल्ह्याला संधी मिळाली असून, नगर जिल्ह्यातील पाच तालुक्यांची या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. बुधवारी पाणी फाऊंडेशनचे संस्थापक अभिनेता अमीर खान व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्त व्हिडीओ कॉन्फरन्स घेऊन जिल्हाधिका-यांना याबाबत सुचना दिल्या.
नगर जिल्ह्यातील दुष्काळी पाथर्डी, जामखेड, कर्जत, नगर आणि पारनेर तालुक्यांची ‘सत्यमेव जयते वाटर कप - २०१८’ स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. या तालुक्यातील ग्रामपंचायतींनी पाणी फाऊंडेशनच्या वाटर कप स्पर्धेत सहभागी होण्यासाठीचा ठराव डिसेंबर अखेरीस पाठविण्याचे आवाहन केले आहे. या स्पर्धेत जलसंधारण आणि पाणीलोट व्यवस्थापन यामध्ये सर्वोत्तम कामगिरी करणा-या गावाला दहा लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. या योजनेत शेततळे, नदीजोड प्रकल्प, यंत्राद्वारे पाणी अडवा, पाणी जिरवा अभियान, बंधारे, शौचालये, स्वच्छता आदी कामे तपासण्यात येणार आहेत. त्यासाठी पाणी फाऊंडेशनने या पाचही तालुक्यात समन्वयकांची नेमणूक केली आहे.
स्पर्धेतील सहभागाच्या अटी
ग्रामपंचायतीने ग्रामसभा बोलावून वॉटर कप स्पर्धेत सहभागी होण्याचा ठराव करणे आवश्यक आहे़ पाणलोट व्यवस्थापनाविषयी ग्रामस्थांना प्रशिक्षण देण्यासाठी पाणी फाऊंडेशन चार दिवसीय शिबिर घेणार आहे. त्यात ग्रामपंचायतीने ५ जबाबदार ग्रामस्थांना पाठविणे आवश्यक आहे. या पाच जणांमध्ये दोन महिला व दोन तरुण आवश्यक आहेत. यातील किमान एकाला स्मार्ट फोन चांगल्या पद्धतीने आॅपरेट करता येणे आवश्यक आहे.