जिल्ह्यात पाच नवीन नगरपंचायतींचा डंका
By Admin | Updated: May 27, 2016 23:11 IST2016-05-27T23:02:24+5:302016-05-27T23:11:56+5:30
प्रशासनाचे आदेश : खंडाळा, दहिवडी, वडूज, पाटण, मेढा येथे तहसीलदारांनी स्वीकारला पदभार

जिल्ह्यात पाच नवीन नगरपंचायतींचा डंका
सातारा : जिल्ह्यातील पाच ठिकाणी नवीन नगरपंचायती जाहीर करण्यात आल्या आहेत. खंडाळा, दहिवडी, वडूज, पाटण आणि मेढा या शहरांचा यामध्ये समावेश आहे. जिल्हाधिकारी डॉ. अश्विन मुदगल यांच्या आदेशावरून त्या-त्या ठिकाणच्या तहसीलदारांनी प्रशासक म्हणून तातडीने पदभार स्वीकारला आहे.
मलकापूर ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा मिळाल्यानंतर तेथील झालेला विकास पाहून अनेक मोठ्या शहरांची नगरपंचायत म्हणून जाहीर करण्याची मागणी होत होती. त्या पाठोपाठ लोणंद आणि कोरेगाव नगरपंचायत जाहीर झाली. दरम्यान, लोणंदची निवडणूकही झाली आहे.
महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम अंतर्गत शुक्रवारी नगरपंचायतींची घोषणा करण्यात आली. यामध्ये औद्योगिकदृष्ट्या विस्तार होत असलेल्या खंडाळा शहराचे नगरपंचायतीत रूपांतर करण्याबाबत वारंवार मागणी होत होती. त्याला शुक्रवारी यश आले. यामुळे खंडाळा तालुक्यात लोणंद आणि खंडाळा अशा दोन नगरपंचायती होणार आहे. त्या पाठोपाठ दहिवडी, वडूज, पाटण व मेढा येथेही नगरपंचायत म्हणून घोषणा करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
खंडाळा
लोकसंख्या : ११ हजार, ग्रामपंचायतीत सत्ता : काँग्रेस, ग्रामपंचायत सदस्य : १५, राजकीय गट : राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप आणि शिवसेना
दहिवडी
लोकसंख्या : १२ हजार, सत्ता : शेखर गोरे, वाघोजीराव पोळ युती, ग्रामपंचायत सदस्य : १५, राजकीय गट : शेखर गोरे-वाघोजीराव पोळ, आमदार जयकुमार गोरे-भास्करराव गुंडगे
वडूज
लोकसंख्या : २५ हजार, सत्ता : काँग्रेस, ग्रामपंचायतसदस्य : १७, राजकीय गट : राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप, शिवसेना
पाटण
लोकसंख्या : ३५ हजार, सत्ता : राष्ट्रवादी, ग्रा. पं. सदस्य :१७, राजकीय गट : पाटणकर व देसाई
मेढा
लोकसंख्या : ८,४८७, सत्ता : राष्ट्रवादी, ग्रामपंचायत सदस्य : १३, राजकीय गट : पांडुरंग जवळ, चंद्रकांत देशमुख