रेनवाॅटर हार्वेस्टिंगसाठी पाचशे कुटुंबांची होणार जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:18 IST2021-03-24T04:18:22+5:302021-03-24T04:18:22+5:30
कोपरगाव : बोअरवेलच्या माध्यमातून भूगर्भातील पाण्याचा उपसा होत आहे. त्यामुळे पाणी पातळी दिवसेंदिवस झपाट्याने कमी होत आहे. अशीच परिस्थिती ...

रेनवाॅटर हार्वेस्टिंगसाठी पाचशे कुटुंबांची होणार जनजागृती
कोपरगाव : बोअरवेलच्या माध्यमातून भूगर्भातील पाण्याचा उपसा होत आहे. त्यामुळे पाणी पातळी दिवसेंदिवस झपाट्याने कमी होत आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास भविष्यात पाण्याच्या भीषण टंचाईला सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे हे टाळण्यासाठी कोपरगाव शहरातील गोदामाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा स्वच्छतादूत आदिनाथ ढाकणे यांनी सोमवारी जलदिनी येत्या पावसाळ्यात शहरातील पाचशे घरांवरील पाणी रेनवाॅटर हार्वेस्टिंग करून बोअरच्या माध्यमातून पुन्हा भूगर्भात सोडण्यासाठी जनजागृतीचा संकल्प केला आहे.
पाणी पातळी वाढविण्यासाठी वेळीच सावध होऊन यावर उपाययोजना केल्या नाहीत तर पुढील पिढीला आपण काय उत्तर देणार? हा प्रश्न निर्माण होणार आहे. विशेष म्हणजे, चार महिन्यांच्या पावसाळ्यात निसर्ग आपल्याला खूप पाणी देतो. परंतु, तेच पाणी भूगर्भात मुरविण्यात होणारे प्रयत्न कमी पडतात. त्यामुळे यापुढे कोपरगाव शहरात तसेच तालुक्यात निर्माण होणाऱ्या नवीन इमारती तसेच निर्मिती झालेल्या घरांच्या छतावरील पाणी हे पावसाळ्यात रेनवाॅटर हार्वेस्टिंग करून पुन्हा भूगर्भात सोडण्यासाठी जनजागृती करणार आहे. त्यासाठी येत्या पावसाळ्यापर्यंत किमान पाचशे घरांवर रेनवाॅटर हार्वेस्टिंग करण्यासंदर्भात जनजागृतीची मोहीम हाती घेतली असून ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असेही ढाकणे यांनी सांगितले.