पाच उमेदवारांचे ‘सीमोल्लंघन’
By Admin | Updated: September 28, 2014 23:27 IST2014-09-28T23:20:32+5:302014-09-28T23:27:30+5:30
अहमदनगर : स्वतंत्र मतदारसंघ नसतानाही नगर तालुक्यातील पाच उमेदवारांनी हक्काच्या मतांची गोळाबेरीज करीत इतर मतदारसंघात ‘सीमोल्लंघन’ केले

पाच उमेदवारांचे ‘सीमोल्लंघन’
अहमदनगर : स्वतंत्र मतदारसंघ नसतानाही नगर तालुक्यातील पाच उमेदवारांनी हक्काच्या मतांची गोळाबेरीज करीत इतर मतदारसंघात ‘सीमोल्लंघन’ केले आहे. तालुक्यातील सर्वपक्षीय मतांची मोट बांधून ‘राहुरी पॅटर्न’ पारनेर व श्रीगोंदा मतदारसंघात राबविण्यासाठी तयारी सुरू केली आहे. यात कोण-कोण बाजी मारील हे मतदारच ठरवणार आहेत.
नगर तालुक्यातील अवघ्या ४० हजार मतांच्या जोरावर भाजपाचे राहुरीचे आ. शिवाजी कर्डिले यांनी मागील वेळी राहुरीचा गड जिंकला. नगर तालुक्याचे स्वतंत्र अस्तित्व उरले नसल्याने इतर मतदारसंघातही हा प्रयोग करत यासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी नगर तालुक्यातील ७५ हजार मतांची शिदोरी घेत श्रीगोंद्यात शिवसेनेकडून प्रस्थापितांविरोधात आव्हान उभे केले आहे. नगर तालुक्यातील मतांची विभागणी करण्यासाठी वाळकी गटाचे जि.प. सदस्य बाळासाहेब हराळ यांना काँग्रेसकडून रिंगणात उतरविण्याचे प्रयत्न झाले, मात्र हराळ यांनी ‘आपली तयारी नसल्याचे’ कारण देत हे प्रयत्न हाणून पाडले. आ. कर्डिले यांच्याही नगर तालुक्यातील मतात विभागणी करण्यासाठी सुरुवातीला गोविंद मोकाटे यांनी अपक्ष तर अखेरच्या क्षणी काँग्रेसकडून राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष अमोल जाधव यांना उमेदवारी दिली गेल्याने या मतदारसंघात नगर तालुक्यातील तीन उमेदवार राहिले आहेत. उमेदवारी अर्ज कोण माघारी घेतो याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. या ठिकाणी नगर तालुक्यातील किती मतांची फाटाफूट होईल याची चर्चा रंगत आहे. पारनेरमधूनही राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत माधवराव लामखडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. कोणत्याही पक्षांची उमेदवारी नाकारून त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. या मतदारसंघात नगर तालुक्यातील सर्वाधिक ९५ हजार मतदार आहेत. येथे शिवसेनेची ताकद असली तरी ही ताकद सध्या प्रा.गाडे यांच्या दिमतीला श्रीगोंद्यासाठी तैनात झाली आहे. यामुळे लामखडे सर्वपक्षीय कार्यकर्ते गळाला लावण्याच्या प्रयत्नात आहेत. कर्डिले यांनी राहुरीतून जशी नगर तालुक्यातील एकतर्फी मते मिळवली तशी आपल्याला मिळतील या तयारीत लामखडे यांची चाचपणी सुरू आहे. पारनेरमधील काही नाराजांशी त्यांचा संपर्क सुरू आहे.
तर भाजपाचे बबनराव पाचपुते हेही नगर तालुक्यातील मतदानावर डोळा ठेवून आहेत. श्रीगोंद्यातील उमेदवारांची भाऊगर्दी पाहता गाडे यात किती यशस्वी होतील हे निवडणुकीतून स्पष्ट होणार आहे. कर्डिले यांच्या विरोधात राहुरीतून एकास एक उमेदवार देण्याचा प्रयत्न युती व आघाडी तुटल्याने अपयशी झाल्याने कर्डिले यांच्या अपेक्षा पुन्हा उंचावल्या आहेत. (प्रतिनिधी)