पहिल्यांदाच पंचरंगी लढत

By Admin | Updated: September 30, 2014 01:29 IST2014-09-30T00:59:31+5:302014-09-30T01:29:24+5:30

संगमनेर : स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजतागायत संगमनेरच्या १५ विधानसभा निवडणुका दुरंगी किंवा तिरंगी झाल्या. आता मात्र चित्र उलट दिसणार असून

For the first time, the five-cornered fight | पहिल्यांदाच पंचरंगी लढत

पहिल्यांदाच पंचरंगी लढत


संगमनेर : स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजतागायत संगमनेरच्या १५ विधानसभा निवडणुका दुरंगी किंवा तिरंगी झाल्या. आता मात्र चित्र उलट दिसणार असून १६ वी निवडणूक पंचरंगी होत असल्याने राजकीय इतिहासात महत्वपूर्ण ठरणार आहे.
संगमनेर तालुका हा स्वातंत्र्यपूर्व काळापासून कम्युनिस्ट पक्षाचा बालेकिल्ला राहीला. १९३७ साली कम्युनिस्ट पक्षाकडून के.बी. दादा देशमुख हे निवडणूक जिंकून संगमनेर तालुक्याचे पहिले आमदार झाले. त्यांनी ल.मा. पाटील, काकासाहेब गरूड यांच्याशी तिरंगी लढत दिली. त्यानंतर १९४६ साली कॉ. दत्ता देशमुख कम्युनिस्ट पक्षाच्या तिकिटावर निवडून आले. त्यांनाही तिरंगी लढत द्यावी लागली. परंतु स्वातंत्र्य चळवळींमुळे कॉ. देशमुख यांना तुरूंगवास झाला. ते तुरूंगात असताना १० महिने बाजीराव कोते आमदार होते. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर ‘असेंब्ली इलेक्शन’ ऐवजी ‘विधानसभा निवडणुका’ हा शब्द प्रचलित झाला. १९५२ सालच्या तिरंगी निवडणुकीत कॉ. देशमुख यांनी कामगार किसान पक्षाचे लोकप्रतिनिधीत्व करून बी.जे. खताळ(काँग्रेस) व भास्करराव दुर्वे(समाजवादी) यांना पराभूत केले. १९५७ ची दुरंगी निवडणूक कॉ. देशमुख आणि सरदार थोरात(काँग्रेस) यांच्यात झाली. त्यात कॉ. देशमुख यांनी विजयश्री मिळविली. मात्र १९६२ ची निवडणूक बी.जे. खताळ(काँग्रेस), कॉ. दत्ता देशमुख(लाल निशाण पक्ष) व भास्करराव दुर्वे(समाजवादी) अशी तिरंगी झाली. त्यात खताळ(काँग्रेस) प्रथमच विजयी झाले.
१९६७ सालच्या दुरंगी लढतीत भास्करराव दुर्वे(समाजवादी) यांना पराभूत करून पुन्हा खताळ विजयी झाले. १९७२ ला पुन्हा दुरंगी लढतीत खताळ (काँग्रेस) यांनी मोहनराव गाडे(समाजवादी) यांना पराभूत केले. १९७८ साली भाऊसाहेब थोरात यांनी दुरंगी लढत करून खताळ(म.स.कॉ.) यांचा पराभव केला. १९८० सालच्या दुरंगी लढतीत खताळ(काँग्रेस) यांच्याकडून संभाजी थोरात यांना पराभव पत्कारावा लागला. १९८५ साली दुरंगी निवडणूक झाली. आयात उमेदवार शकुंतला थोरात(काँग्रेस) यांना तिकीट देण्यात आले. त्यांना बाळासाहेब थोरात(अपक्ष) यांनी पराभूत करून राजकारणाचा श्रीगणेशा केला. १९९० साली दुरंगी लढतीत थोरात यांनी वसंतराव गुंजाळ(भारतीय जनता पक्ष), १९९५ साली बापूसाहेब गुळवे(अपक्ष), १९९९ साली बापूसाहेब गुळवे(शिवसेना), २००४ साली संभाजी थोरात(शिवसेना), २००९ साली बाबासाहेब कुटे(शिवसेना) यांना पराभूत केले. १९९० ते २००९ अशा पाचही निवडणुका दुरंगी झाल्या आहेत. पण, २०१४ सालच्या या निवडणूकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी व शिवसेना-भाजप-मित्रपक्षांची महायुती दुभंगल्याने चित्र एकदम पालटून गेले. प्रत्येक पक्षाकडून उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने राज्यासह संगमनेर तालुक्यात प्रथमत: पंचरंगी लढती होत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: For the first time, the five-cornered fight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.