आधी प्रेयसीचा खून, नंतर दुसरे लग्न अन् सराफाची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:17 IST2021-06-04T04:17:27+5:302021-06-04T04:17:27+5:30
शिरुर कासार येथील सराफाच्या खुनातील मुख्य आरोपी ज्ञानेश्वर ऊर्फ भैय्या गायकवाड व केतन लोमटे (रा. शिरुर कासार, जि. बीड) ...

आधी प्रेयसीचा खून, नंतर दुसरे लग्न अन् सराफाची हत्या
शिरुर कासार येथील सराफाच्या खुनातील मुख्य आरोपी ज्ञानेश्वर ऊर्फ भैय्या गायकवाड व केतन लोमटे (रा. शिरुर कासार, जि. बीड) यांनीच शीतल भामरे (रा. गाडेकर मळा, नाशिक) या तरुणीचा खून केल्याचे पोलीस तपासात समोर आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
आरोपी ज्ञानेश्वर मूळचा भातकुडगाव (ता. शेवगाव) येथील रहिवासी आहे. गावात मुलींची छेड काढत असल्याने घरच्यांनी त्याला मामाकडे शिरूर कासार (जि. बीड) येथे पाठवले. सोशल मीडियातून शीतल भामरे या विवाहितेची ओळख झाली. तिला दोन मुले होती. तिचे ज्ञानेश्वरसोबत प्रेम जमल्याने सहा महिन्यांपूर्वी तिने शिरूर कासार गाठले. दोघे एकत्र राहू लागले. चारित्र्याच्या संशयावरून त्रास सुरू झाल्याने तिने परत नाशिकला जाण्याची तयारी केली. ज्ञानेश्वरने नाशिकला जाताना मित्र केतन लोमटेच्या मदतीने राहुरी फॅक्टरीजवळील गुंजाळ नाक्याजवळ प्रेयसी शीतलचा डोक्यात दगड घालून खून केला. अडीच महिन्यांपासून पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके खुनाचा तपास करीत होते. परंतु तरुणीची ओळख पटत नव्हती.
दरम्यान, आरोपी ज्ञानेश्वरने एप्रिल महिन्यात पुन्हा दुसऱ्या मुलीशी लग्न केले. पत्नीला दागिने देण्यासाठी सराफ व्यावसायिक विशाल सुभाष कुलथे (वय २५, रा. शिरुर कासार) यांना दागिने घेऊन घरी बोलावले. त्यांचा पंधरा दिवसांपूर्वी खून केला. मृत विशालला वडील नाहीत. वृद्ध आजोबा सुधाकर जगन्नाथ कुलथे (वय ७०) नातवाच्या खुनाच्या धक्क्याने मृत्यू पावले. विशालचा मृतदेह आरोपीने मामाच्या दुचाकीवरून भातकुडगाव (ता. शेवगाव) येथे शेतात नेऊन पुरला. चौकशीचा ससेमिरा लागल्याने भीतीपोटी आरोपीचे मामा अजिनाथ गायके (रा. शिरुर कासार) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. आरोपी ज्ञानेश्वर याने दोन खून केले असून दोन मृत्यूस तो कारणीभूत ठरला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
...........
मुख्य आरोपी ज्ञानेश्वर गायकवाड याने प्रेयसी शीतल भामरे हिचा राहुरी फॅक्टरी येथे खून केल्याची कबुली दिली आहे. शिरूर कासार (जि. बीड) येथे विशाल कुलथे यांच्या खून प्रकरणात आरोपी पोलीस कोठडीत आहे. दोन दिवसांनी कोठडी संपल्यावर आरोपीला राहुरी फॅक्टरी येथील खून प्रकरणात अटक करण्यासाठी न्यायालयात अर्ज दिला जाणार असून मगच अधिक घटनेचा उलगडा होणार आहे.
- संदीप मेटके, डीवायएसपी, श्रीरामपूर