आधी प्रेम.... नंतर गर्भपातासाठी धमक्या
By Admin | Updated: October 28, 2014 01:01 IST2014-10-28T00:21:30+5:302014-10-28T01:01:00+5:30
अहमदनगर : महाविद्यालयीन तरुणीसोबत वर्षभर प्रेमसंबंध ठेवून ती गर्भवती राहिल्यानंतर लग्नाला नकार देत तिला गर्भपात करण्यासाठी धमक्या देणारा वकील व त्यांच्या

आधी प्रेम.... नंतर गर्भपातासाठी धमक्या
अहमदनगर : महाविद्यालयीन तरुणीसोबत वर्षभर प्रेमसंबंध ठेवून ती गर्भवती राहिल्यानंतर लग्नाला नकार देत तिला गर्भपात करण्यासाठी धमक्या देणारा वकील व त्यांच्या कुटुंबियांविरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी मुलाच्या आई-वडिलांसह बहिणीलाही अटक केली आहे. संशयित वकील मात्र फरार झाला आहे. आरोपीने पीडित मुलीला तिच्या आई-वडिलांना संपवून टाकण्याची धमकी दिली तसेच पाच लाख रुपये घेऊन प्रकरण मिटवण्यासाठी दबावही आणला होता.
मुलीच्या फिर्यादीवरून संशयित वकील, त्याचे आई-वडील, बहीण यांच्याविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल झाला. हे सर्व जण व्यवसायाने वकील आहेत. संशयिताने लग्नाचे आमिष दाखवून राहत्या घरी, हॉटेल आदी ठिकाणी नेऊन २०१३ ते २०१४ या काळात लैंगिक अत्याचार केला. फिर्यादी तरुणी व संशयिताची एका खासगी क्लासमध्ये ओळख झाली होती. त्याचे रुपांतर प्रेमात झाले.
संशयित पीडित तरुणीला वारंवार लग्नाचे आमिष दाखवत होता.
(प्रतिनिधी)
या प्रकरणातील फिर्यादी तरुणीने २००७ मध्ये न्यू आर्टस् कॉलेजमध्ये प्रवेश घेतला, तर अॅड. अभिजित याने न्यू लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. एका खासगी क्लासमध्ये त्यांच्या ओळखी झाल्या. त्याचे रुपांतर प्रेमात झाले. लग्नाचे आमिष वारंवार दाखवूनही तरुणीने शरीरसंबंधास नकार दिला होता. मात्र अॅड. अभिजित याने लग्नाचे वचन दिल्याने दोघांनी तिरुपती येथे एका हॉटेलात जाऊन संबंध ठेवले. त्यानंतर एका झरेकर आत्महत्या प्रकरणात कोठारी कुटुंबीयांवर गुन्हा दाखल झाल्याने ते फरारी होते. या प्रकरणातून ते जामिनावर सुटल्यानंतर अभिजित याने पुन्हा संबंध ठेवले. त्यानंतर तब्येतीच्या कारणावरून डॉक्टरांकडून तपासणी केली असता १५ आठवड्यांचा गर्भ राहिल्याचे डॉक्टरांनी निदान केले. यावेळी अभिजित व त्याच्या कुटुंबीयांनी गर्भपात करण्यासाठी धमक्या दिल्या. तसे न केल्यास आई-वडिलांना संपवून टाकण्याची धमकी दिली. पाच लाख रुपयांवर मिटवून घेण्यासाठीही दबाव आणला, असे फिर्यादित म्हटले आहे.
लैंगिक अत्याचार आणि धमकी प्रकरणातील आरोपी अॅड. राजेश, अॅड. मंगला कोठारी आणि रेणू झरकर यांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एम.एस.तोडकर यांनी २९ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अत्याचारीत तरुणीला गर्भपातासाठी मोबाईलवरून धमक्या दिल्या आहेत. ते मोबाईल जप्त करणे तपासासाठी आवश्यक असल्याचा युक्तीवाद सरकारी वकील अॅड. सचिन सूर्यवंशी यांनी केला. तो ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपींना कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी अॅड. अभिजित कोठारी अद्याप फरार आहे.