अहमदनगर : नगर शहरातील बाजारपेठेत पुन्हा गर्दी उसळली असून, महापालिकेच्या दक्षता पथकाने कारवाईची मोहीम हाती घेत दोन दिवसांत ५२ हजारांचा दंड केला.
कोरोनाची दुसरी लाट ओसरलेली नाही. शहरासह जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत आहे. शनिवार व रविवारी पूर्णपणे बंद ठेवण्याचा आदेश आहे. परंतु, शहर व परिसरात शनिवार व रविवारीही गर्दी होत असून, दुकाने सुरू आहेत. विनामास्क फिरणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. महापालिकेच्या दक्षता पथकाने विनामास्क न फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याची मोहीम उघडली आहे. गेल्या दोन दिवसांत मास्क न वापरणाऱ्या १३८ नागरिकांवर कारवाई केली आहे. तसेच सुरू असलेल्या दुकानदारांवर ही कारवाई करण्यात आली असून, गेल्या दोन दिवसांत ५२ हजार ६०० रुपये दंड करण्यात आला आहे.
महापालिकेच्या दक्षता पथकाने शहरातील मुख्य बाजारपेठ, सावेडी उपनगर, रेल्वे स्टेशन तेलीखुंट, दाळमंडई, कापड बाजार, गंज बाजार, गुलमोहोर रोड, पाईपलाईन रोड, एकवीरा चौक, श्रीराम चौक, केडगाव, बोल्हेगाव, बुरुडगाव रोड, वाडीयापार्क आदी परिसराची प्रत्यक्ष पाहणी करत कारवाई केली. कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. रविवारी शहरात ४६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. मागील आठवड्यात ही संख्या कमी होती. पथकात शशिकांत नजान, राकेश कोतकर, नंदकुमार नेमाणे, सूर्यभान देवघडे, राहुल साबळे, राजेश आनंद, अमोल लहारे, अनिल आढाव, भास्कर आकुबत्तीन, रवींद्र सोनावणे, संदीप वैराळ, रिजवान शेख, नंदू रोहोकले, राजेंद्र बोरुडे, गणेश वरुटे, कांगुर्डे, राजु जाधव, विष्णू देशमुख, अमित मिसाळ, अंबादास गोंटला यांचा समावेश होता.
...
आठवड्यातील सर्वाधिक रुग्ण
नगर शहरात आठवड्यातील सर्वाधिक ४६ रुग्ण रविवारी आढळले आहेत. शहरातील कमी असलेली रुग्णसंख्या वाढू लागली असून, वाढती रुग्णसंख्या सर्वांचीच चिंता वाढविणारी आहे. नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आले नियम पाळले जात नसल्याचे गेल्या दोन दिवसांतील कारवाईवरून स्पष्ट झाले आहे.