मास्कचा वापर न करणाऱ्यांकडून ११ लाखांचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:21 IST2021-03-05T04:21:03+5:302021-03-05T04:21:03+5:30

अहमदनगर : जिल्ह्यात मास्क वापरला नाही, अशा दहा हजार व्यक्तींवर प्रशासनाने कारवाई केली आहे. अशांकडून तब्बल ११ लाख रुपयांचा ...

A fine of Rs 11 lakh was levied on those who did not wear masks | मास्कचा वापर न करणाऱ्यांकडून ११ लाखांचा दंड वसूल

मास्कचा वापर न करणाऱ्यांकडून ११ लाखांचा दंड वसूल

अहमदनगर : जिल्ह्यात मास्क वापरला नाही, अशा दहा हजार व्यक्तींवर प्रशासनाने कारवाई केली आहे. अशांकडून तब्बल ११ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी दिली.

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी जिल्ह्यात करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली विविध यंत्रणा कार्यरत झाल्या आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येत आहे. फेब्रुवारी महिन्यापासून रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन प्रशासनाने नियम न पाळणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई सुरू केली. २० फेब्रुवारी ते ३ मार्चपर्यंत मास्क न वापरणाऱ्या १० हजारांहून अधिक जणांवर दंडात्मक कारवाई केली. यामध्ये ११ लाख ३६ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

मागील महिन्यापासून जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे निदर्शनास येताच जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू केल्या. रात्री अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना फिरण्यास बंदी केली. सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर, सुरक्षित अंतर आणि सॅनिटायझरचा वापर, वारंवार हात धुणे, आदींबाबत त्यांनी नागरिकांना आवाहन केले. याशिवाय, गर्दी टाळण्याचेही आवाहन केले. नियमांची कडक अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने सर्व तहसीलदार, पोलीस यंत्रणा, जिल्हा परिषद, महानगरपालिकांना निर्देश दिले. त्यानुसार जिल्ह्यात नियम मोडणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे.

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत तालुका आणि गावपातळीवरील सर्व यंत्रणेला निर्देश दिले आहेत. कोरोना प्रादुर्भाव वाढू नये यासाठी संबंधितांना दंडात्मक कारवाईचे अधिकार दिले आहेत. मास्क न वापरणाऱ्यांना वचक बसावा यासाठी दंडाची रक्कम आता शंभर रुपयांवरून पाचशे रुपये इतकी करण्यात आली आहे.

----------

दंडात्मक वसुली १३ लाख

२० फेब्रुवारी ते ३ मार्च २०२१ या कालावधीत लग्न समारंभ, हॉटेल, रेस्टॉरंट, सिनेमा हॉल, धार्मिक स्थळे आणि इतर सार्वजनिक ठिकाणे अशा ९५७ ठिकाणी तपासणी करण्यात आली. त्यापैकी १९१ ठिकाणांवर दंडात्मक कारवाई करून २ लाख ४ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच मास्क न वापरणाऱ्या १० हजार १५० जणांकडून ११ लाख ३६ हजार ७०० रुपयांच्या दंडाची वसुली करण्यात आली.

Web Title: A fine of Rs 11 lakh was levied on those who did not wear masks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.