अखेर आढळाधरणातून रब्बी आवर्तन सुटले : सुरक्षेच्या कारणास्तव कमी दाबाने प्रवाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 20:09 IST2018-01-16T20:01:49+5:302018-01-16T20:09:21+5:30
अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर मंगळवारी दुपारी अकोले तालुक्यातील आढळा धरणातून रब्बी हंगामाचे पहिले आवर्तन जलसंपदा विभागाने सोडले.

अखेर आढळाधरणातून रब्बी आवर्तन सुटले : सुरक्षेच्या कारणास्तव कमी दाबाने प्रवाह
गणोरे : अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर मंगळवारी दुपारी अकोले तालुक्यातील आढळा धरणातून रब्बी हंगामाचे पहिले आवर्तन जलसंपदा विभागाने सोडले.
मात्र, धरणाच्या लाभक्षेत्रात दोन्ही कालव्यांतून यंदाचा पाण्याचा पहिलाच प्रवाह कालव्यांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव कमी दाबाने सोडण्यात आला आहे. कालव्यांतील अडथळ्यांची भीती असल्याने, रात्रीच्या वेळी पाण्याचा प्रवास सिंचन यंत्रणेसाठी चिंताजनक असल्याचे समजते. नेहमी पहाटेच्या वेळी पाणी सोडून दिवसभरात पाण्याच्या प्रवाहातील तुंबलेल्या अडथळ्यांना दूर करता येते. मात्र, यंदा अद्याप कालव्यांतील स्वच्छता पुरेशी झालेली नाही. आवर्तन सोडण्याबाबत आजही द्विधा मनस्थितीत असलेल्या अधिका-यांनी अखेर दुपारी दोन्ही कालव्यांत प्रत्येकी २० क्युसेकने पाणी सोडले आहे. सोमवार १५ जानेवारीस पहाटे हे आवर्तन जाहीर केल्याप्रमाणे पुरेशा तयारीअभावी सोडताच आले नाही. त्यामुळे उशिराने मंगळवारी दुपारी सोडण्यात आले आहे.
पहिल्यांदाच रब्बीचे आवर्तन एवढे रखडले
रब्बी हंगाम सुरू होऊनही तीन महिने उलटले. नुकतेच कालव्यांमधील गवत व झाडा - झुडपांच्या सफाईचे काम घाईघाईत करण्यात आले आहे. धरणाच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या उशिरापर्यंत रब्बी हंगामाच्या आवर्तनाचे नियोजन रखडण्याची वेळ आली आहे. एक हजार ६० दशलक्ष घनफूट क्षमतेच्या धरणात ९७२ दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे. धरणातील उपयुक्त पाणी साठ्यातून रब्बी हंगामातील अन्नधान्य, चारापिके,उभ्या भुसार पिकांसाठी पाणी देण्यात येणार आहे.