जोरदार शक्ती प्रदर्शनात गडाख यांचा अर्ज दाखल
By Admin | Updated: September 26, 2014 00:18 IST2014-09-26T00:06:25+5:302014-09-26T00:18:14+5:30
नेवासा : शंकरराव गडाख यांनी शक्तीप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

जोरदार शक्ती प्रदर्शनात गडाख यांचा अर्ज दाखल
नेवासा : राष्ट्रवादीचे आमदार शंकरराव गडाख यांनी नेवासा मतदारसंघातून जोरदार शक्तीप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तरुणांचा मोठा जल्लोष, गगनभेदी घोषणा, ढोल ताशाचा गजर, शहरात फुलांचा वर्षाव, संगीताच्या तालावर नाचणारे युवक, महिलांकडून ठिकठिकाणी औक्षण व कार्यकर्त्यांनी शंकररावांचा जयजयकार करीत अर्ज दाखल केला.
यावेळी झालेल्या सभेत आ. गडाख म्हणाले, मी टीका करणार नाही असे यापूर्वी म्हणालो होतो, परंतु मी शांत बसतो याचा विरोधकांनी दुसरा अर्थ काढू नये. माझे नाव शंकर आहे मी जर माझे दोन्ही डोळे वटारले तर विरोधकांची मोठी फजिती होईल. तालुक्यातील अनेक प्रलंबित प्रश्न सुटले आहे.
विकासाचे मोठे काम तालुक्यात झाले आहे हे विरोधकांना देखवत नसल्याने त्यांनी माझ्यावर वैयक्तिक टीका चालू केली आहे. परंतु त्यांच्या टिकेला सुज्ञ जनताच उत्तर देईल, असे ते म्हणाले.
अध्यक्षस्थानी भाऊसाहेब पटारे हे होते. गडाख पुढे म्हणाले, सरकारची कामे प्रभावीपणे केली. केलेले काम सांगायला मला आवडत नाही. परंतु मला हिशोब मागितला जातो. विरोधक स्वत: बेहिशोबी झाल्याने त्यांचा तोल सुटला आहे. त्यामुळे ते खालच्या पातळीवर टीका करीत आहे. विकास कामाचा वसा मी सोडणार नसून, गारपीट, वादळ, गोरगरीब, निराधार, वारकऱ्यांचा व महिलांचा विमा अशी खूप कामे माझ्या ५ वर्षाच्या कारकिर्दीमध्ये झाली आहे. विरोधकांचा विकास शून्य आहे. त्यामुळे त्यांना टीका करण्याचा अधिकारी नाही, परंतु जनता सूज्ञ असून ते विरोधकांना आपली जागा दाखवून देतील, असे आ. गडाख म्हणाले.
यावेळी ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख म्हणाले, एवढ्या मोठ्या संख्येने सर्वजण आलात हीच मोठ्या मताधिक्याची नांदी अहे. आ. गडाख यांनी गेल्या पाच वर्षात रस्ते, वीज, पाणी या क्षेत्रात मोठे काम केले आहे. विकासाच्या मुद्यावर तुम्हाला ते मत मागत आहेत. शंकरराव व विठ्ठलरावांच्या रुपाने आमच्याकडे दोन ढाण्या वाघ आहेत. वैयक्तिक टीका न करता सुसंस्कृतपणा सर्वांनी ठेवला पाहिजे.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग अभंग म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसने आजपर्यंत सर्वसामान्य माणसाला न्याय दिला आहे. केंद्रातील सरकारने शेतकरी अडचणीत आणला आहे. आ. गडाख यांच्या मागे जनता उभी राहणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विठ्ठलराव लंघे म्हणाले, मीही खूप संघर्ष केला. परंतु वैयक्तिक पातळीवर कधी टीका केली नाही. तालुक्याचा विकास डोळ्यासमोर ठेऊन आ. गडाख यांचे नेतृत्व मान्य केले. (तालुका प्रतिनिधी)