बनावट दिव्यांग प्रमाणपत्र, ओळखपत्रधारकांवर गुन्हा दाखल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:36 IST2020-12-13T04:36:05+5:302020-12-13T04:36:05+5:30
शेवगाव : सावली दिव्यांग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दाखल केलेल्या बनावट अपंगाचे प्रमाणपत्र, ओळखपत्र प्रकरणात, तक्रारीमध्ये तथ्य आढळून आल्याने संबंधित व्यक्तींविरुद्ध ...

बनावट दिव्यांग प्रमाणपत्र, ओळखपत्रधारकांवर गुन्हा दाखल करा
शेवगाव : सावली दिव्यांग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दाखल केलेल्या बनावट अपंगाचे प्रमाणपत्र, ओळखपत्र प्रकरणात, तक्रारीमध्ये तथ्य आढळून आल्याने संबंधित व्यक्तींविरुद्ध जि.प.चे जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांना फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिव्यांग कल्याण आयुक्तांनी दिले आहेत.
समाज कल्याण अधिकारी यांना अपंगाचे प्रमाणपत्र घेऊन आलेल्या चौघांच्या प्रमाणपत्राबाबत शंका आल्याने त्यांनी ते जप्त करून जिल्हा रुग्णालयात पडताळणीकरिता पाठविले होते. सदरचे प्रमाणपत्र जिल्हा रुग्णालयाने दिले नसल्याचे सिद्ध झाले. तरीही त्या चौघांच्या विरोधात गुन्हे दाखल न झाल्याने सावली दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब महापुरे यांनी आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती. राज्य परिवहन महामंडळाच्या शेवगाव आगारप्रमुखांनी काही व्यक्तींचे बनावट अपंग ओळखपत्र जप्त केले होते. याबाबतची माहिती माहितीच्या अधिकारान्वये मिळवून संघटनेचे उपाध्यक्ष चाँद शेख यांनी त्या व्यक्तींच्या विरोधात तक्रार अर्ज दाखल केला होता.
या दोन्हीही तक्रारअर्जावर दिव्यांग कल्याण आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांनी २ डिसेंबर रोजी संयुक्त निकाल देताना समाजकल्याण अधिकारी, जिल्हा परिषद अहमदनगर यांना संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. दिलेल्या निकालात विक्रम विष्णूकांत राठी, विश्वनाथ ग्यानदेव फाळके, महेश दशरथ मते, सुनील खंडू पवार यांच्या तसेच शेवगाव आगाराने जप्त केलेल्या ओळखपत्रधारकांच्या विरोधात गुन्हे दाखल करावे, असे आदेश दिले आहेत.