प्रिंटिंग व्यवसायाचे पन्नास कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:35 IST2020-12-13T04:35:54+5:302020-12-13T04:35:54+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : कोरोनामुळे कमी संख्येत विवाह सोहळे होत असल्याने लग्नपत्रिकांची छपाई सध्या पूर्णपणे बंद आहे. दुसरीकडे ...

Fifty crore loss to the printing business | प्रिंटिंग व्यवसायाचे पन्नास कोटींचे नुकसान

प्रिंटिंग व्यवसायाचे पन्नास कोटींचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : कोरोनामुळे कमी संख्येत विवाह सोहळे होत असल्याने लग्नपत्रिकांची छपाई सध्या पूर्णपणे बंद आहे. दुसरीकडे नऊ महिन्यांपासून शाळा-महाविद्यालये बंद असल्याने शैक्षणिक साहित्याची छपाई बंदच आहे. नऊ महिन्यांच्या काळात नगर शहरातील प्रिंटिंग क्षेत्रातील व्यावसायिकांचे तब्बल ५० कोटींपेक्षा जास्त नुकसान झाले असून, सध्याही ९० टक्के व्यवसाय बंद असल्याचा दावा व्यावसायिकांनी केला आहे. कोरोना काळात छपाई यंत्रे बंद असल्याने देखभाल-दुरुस्तीच्या खर्चाचा मोठा भुर्दंड सोसावा लागल्याने व्यावसायिकांवर आर्थिक संकट कोसळले आहे.

ऐन मार्च-२०२० मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. त्यानंतर एप्रिल ते जून या काळात होणारा लग्नसराईमधील व्यवसाय पूर्णपणे बंद पडला. विवाह सोहळे न झाल्याने लग्नपत्रिकांची छपाई बंद होती. सध्या ५० पेक्षा जास्त जणांना विवाह सोहळ्यास उपस्थित राहण्याची परवानगी नसल्याने कमी संख्येतच सोहळा उरकला जात आहे. त्यामुळे कोणीच आता लग्नपत्रिका छापत नाही. त्याऐवजी डिजिटल स्वरूपात सोशल मीडियाद्वारे वाटप केली जात आहे. त्यामुळे लग्नपत्रिका छपाईमधून होणारा लाखो रुपयांचा धंदाही बुडाला आहे.

गेल्या नऊ महिन्यांपासून शाळा, महाविद्यालये बंदच आहेत. त्यामुळे विद्यार्थी व शाळा-महाविद्यालयांना लागणाऱ्या सर्व साहित्याची छपाई बंद आहे. दोन-तीन महिने शासकीय कार्यालये बंद होती. अनलॉक झाले तरी सामान्य माणूस शासकीय कार्यालयाकडे फिरकत नव्हता, तसेच शासकीय सोयी-सुविधा ऑनलाइन झाल्याने शासकीय कागदपत्रांची छपाई बंद झाली आहे.

-----------

नगर शहरातील व्यवसायाची स्थिती

प्रिंटिंग व्यावसायिकांची संख्या -३००

व्यवसायात काम करणाऱ्यांची संख्या- ५ हजार

एका व्यावसायिकाचे सरासरी उत्पन्न- १५ लाख

एकूण नुकसान- ४५ ते ५० कोटी

---------

एप्रिल ते जून या काळातील लग्नसराईमध्ये लग्नपत्रिका छपाईचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प होता व अजूनही ठप्पच आहे. विवाह सोहळ्यांना फक्त ५० लोकांनाच उपस्थित राहण्याची परवानगी आहे. त्यामुळे कोणी लग्नपत्रिका छापण्याच्या भानगडीत पडत नाही. शिवाय पत्रिकांच्या नमुन्यांमध्ये दिवसेंदिवस बदल होत असल्याने पूर्वीचा कच्चा माल जवळपास वाया गेला आहे. त्याचेही नुकसान सोसावे लागले आहे.

-विनय गुंदेचा, प्रिंटिंग व्यावसायिक

-------------

प्रिंटिंग व्यवसायाची व्याप्ती मोठी आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. या व्यवसायात नगर शहरात काम करणाऱ्यांची संख्या पाच हजार आहे. कोरोना काळात मशीन बंद असल्याने देखभाल-दुरुस्तीसाठी मोठा खर्च आला. शाळा-महाविद्यालये, कार्यालये बंद असल्याने साहित्य छपाई पूर्णपणे बंदच आहे. ऑनलाइनमुळे वह्या-पुस्तकांना मागणी नसल्याने छपाई बंदच आहे.

---

फोटो- १० प्रिंटिंग मशीन

Web Title: Fifty crore loss to the printing business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.