चाऱ्याचा काटा मारल्यास पाच रुपये दंड
By Admin | Updated: June 2, 2016 23:08 IST2016-06-02T23:00:06+5:302016-06-02T23:08:53+5:30
अहमदनगर : जनावरांना नियमापेक्षा कमी चारा दिल्याचे आढळून आल्यास प्रति दिनी प्रति जनावर, याप्रमाणे पाच रुपये दंड आकारला जाणार आहे़

चाऱ्याचा काटा मारल्यास पाच रुपये दंड
अहमदनगर : जनावरांच्या चारा छावण्यांसाठीचे दंड जिल्हा प्रशासनाकडून निश्चित करण्यात आले असून, जनावरांना नियमापेक्षा कमी चारा दिल्याचे आढळून आल्यास प्रति दिनी प्रति जनावर, याप्रमाणे पाच रुपये दंड आकारला जाणार आहे़ प्रांत अधिकाऱ्यांकडून ही कारवाई करण्यात येणार आहे़
जिल्ह्यात ३५ छावण्या सुरू आहेत़ छावण्या सुरू होऊन दोन महिने उलटून गेले आहेत़ छावण्यांकडून अनुदानाचीही मागणी करण्यात येत आहे़ पण, छावणी चालकांकडून सरकारचे नियम धाब्यावर बसविले जात असलयाचे प्रशासनाच्या निदर्शनास आले़ त्यामुळे प्रशासनाने सावध भूमिका घेत छावण्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला़ दंड प्रति दिन प्रति जनावरे, या प्रमाणे आकारण्यात येणार आहे़ तहसीलदारांनी प्राधिकृत केलेल्या नायब तहसीलदारांचे पत्र न घेता जनावरे छावणीत दाखल करून घेण्याचे प्रकार घडले आहेत़ प्रशासनाला न विचारता जनावरे दाखल करून घेणाऱ्या छावण्यांना प्रति दिन दहा हजार रुपये दंड आकारला जाणार आहे़ नियमानुसार लहान व मोठ्या जनवारांना चारा न दिल्यास अनुदानातून प्रति दिन प्रती जनावर पाच रुपये, नोंद न ठेवल्यास पाच रुपये, निवाऱ्यांची व्यवस्था न केल्यास मोठे जनावर पाच रुपये आणि लहान जनावरांसाठी प्रति दिनी दोन रुपये ५० पैसे दंड अकारण्यात येणार आहे़ छावण्यांची तपासणी करण्याचे आदेश तहसीलदारांना मध्यंतरी देण्यात आले होते़ मात्र अवघ्या सात छावण्यांचे अहवाल प्रशासनास प्राप्त झाले आहेत़ त्यामुळे छावण्यांवर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार प्रांतांना देण्यात आले असून, दंडात्मक कारवाया करण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले़