महाविकास आघाडीत फूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:15 IST2021-06-29T04:15:31+5:302021-06-29T04:15:31+5:30

अहमदनगर : महापौर पदावर दावा ठोकणाऱ्या काँग्रेसला बाजूला ठेवत आघाडीने सेनेच्या रोहिणी शेंडगे यांचा उमेदवारी अर्ज सोमवारी दाखल केला. ...

Feet in the Mahavikas front | महाविकास आघाडीत फूट

महाविकास आघाडीत फूट

अहमदनगर : महापौर पदावर दावा ठोकणाऱ्या काँग्रेसला बाजूला ठेवत आघाडीने सेनेच्या रोहिणी शेंडगे यांचा उमेदवारी अर्ज सोमवारी दाखल केला. यावेळी काँग्रेसचे नगरसेवक गैरहजर होते. दरम्यान, काँग्रेसने महापौर व उपमहापौर पदासाठी अर्ज नेले आहेत. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या जिल्ह्यातच काँग्रेसची अशी फरपट झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

महापौर पदासाठी बुधवारी ऑनलाईन निवडणूक होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मंगळवारी (दि. २९) अखेरचा दिवस आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार व सेनेचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या बैठकीत सेना-राष्ट्रवादीच्या आघाडीवर शिक्कामोर्तब झाले. त्यानुसार आघाडीच्यावतीने सेनेच्या शेंडगे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप, सेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, दक्षिण जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, सेनेचे ज्येष्ठ नगरसेवक अनिल शिंदे, गणेश कवडे, अशोक बडे, राष्ट्रवादीचे नगरसेवक गणेश भोसले, स्थायी समिती सभापती अविनाश घुले, विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, विनीत पाऊलबुद्धे, प्रकाश भागानगरे आदी सेना व राष्ट्रवादीचे नगरसेवक उपस्थित होते. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची महाविकास आघाडी आहे. नगरच्या महापौर निवडणुकीतून काँग्रेसला वगळण्यात आले आहे. काँग्रेसने महापौर पदावर दावा केला होता. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दीप चव्हाण यांनी पत्नी शीला चव्हाण यांच्यासाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे उमेदवारी मागितली होती. महसूलमंत्री थोरात व चव्हाण यांच्यात महापौर निवडणुकीबाबत चर्चाही झाली होती. त्यानंतर मुंबईत बैठक होऊन सेना- राष्ट्रवादीच्या आघाडीचा निर्णय झाला. महसूलमंत्री बाळसाहेब थोरात हे महाविकास आघाडीच्या समन्वय समितीत आहेत. परंतु, नगरच्या महापौर पदाबाबत मुंबईत झालेल्या बैठकीला थोरात उपस्थित नव्हते. महसूलमंत्री थोरात यांनी महापौर निवडणुकीबाबत भाष्य केले नाही. त्यामुळे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भूमिका गुलदस्त्यात राहिली आहे. असे असले तरी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चव्हाण यांनी पत्नी शीला चव्हाण यांच्या नावाने महापौर व उपमहापौर पदाचे नामनिर्देशनपत्र घेतले आहे. सेनेकडून शेंडगे यांना बिनविरोध महापौर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु, सेनेचा बिनविरोधचा मार्ग काँग्रेसने रोखून धरल्याचे दिसते आहे.

.....

बसपाचे नगरसेवकही गैरहजर

महापालिकेत बसपाचे चार नगरसेवक आहेत. गतवेळी भाजपाला पाठिंबा दिल्याच्या बदल्यात बसपाला स्थायी समिती सभापती पद मिळाले होते. यावेळी मात्र सेना व राष्ट्रवादी एकत्र आले आहेत. आघाडीच्या वतीने सेनेच्या शेंडगे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना बसपाचे नगरसेवकही उपस्थित नव्हते.

...

उपमहापौर पदासाठी राष्ट्रवादीतून कोण

उपमहापौर पदासाठी राष्ट्रवादीकडून गणेश भोसले, विनीत पाऊलबुद्धे, ज्योती अमोल गाडे, मीना संजय चोपडा यांच्या नावाची चर्चा आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस आहे. राष्ट्रवादीकडून उपमहापौर पदाची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. त्यामुळे उपमहापौर पदासाठी राष्ट्रवादीकडून कोण अर्ज दाखल करणार याची उत्सुकता आहे.

....

महापौर निवडणुकीत काँग्रेस सोबत आहे. तसा निर्णयही वरिष्ठ पातळीवर झालेला आहे. त्यामुळे महापौर व उपमहापौर निवडणुकीत काँग्रेसही सोबत राहील.

- भाऊ कोरगावकर, संपर्कप्रमुख

....

फोटो-

महापौर पदासाठी महापालिका कार्यालयात सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करताना शिवसेनेच्या उमेदवार रोहिणी संजय शेंडगे. यावेळी आमदार संग्राम जगताप यांच्यासह शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीचे नगरसेवक उपस्थित होते. (छायाचित्र- साजिद शेख)

Web Title: Feet in the Mahavikas front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.