फेब्रुवारी महिन्यात भिंगारला मिळाले अवघे चार दिवस पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:19 IST2021-03-06T04:19:50+5:302021-03-06T04:19:50+5:30
भिंगार : फेब्रुवारी महिन्यात छावणी परिषद प्रशासनाने भिंगारला अवघे चारच दिवस पाणी सोडले आहे. येथील पाणीप्रश्न असा बिकट झाल्याने ...

फेब्रुवारी महिन्यात भिंगारला मिळाले अवघे चार दिवस पाणी
भिंगार : फेब्रुवारी महिन्यात छावणी परिषद प्रशासनाने भिंगारला अवघे चारच दिवस पाणी सोडले आहे. येथील पाणीप्रश्न असा बिकट झाल्याने नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. सतत पाणी प्रश्न उद्भवत असल्याने नागरिकांमध्ये छावणी परिषद प्रशासनाविषयी प्रचंड रोष आहे.
गेल्या काही महिन्यांपासून भिंगारमध्ये पाणीपुरवठा अनियमित आहे. वेळेवर पाणी सुटत नाही. पाच वर्षांपूर्वी दिवसातून दोनवेळा पाणी सुटत होते. परंतु, आता आठवड्यातून दोन ते तीन वेळाच पाणी सोडले जाते. तेही फेब्रुवारी महिन्यात अवघ्या चारच दिवस सुटले. यामुळे नागरिकांना नाईलाजास्तव पाणी विकत घ्यावे लागते. काही नागरिकांनी पाण्यासाठी वणवण फिरावे लागते. राजकीय पक्षाने किंवा संघटनांनी आंदोलन केल्यानंतर दोन ते तीन दिवस पाणीपुरवठा सुरळीत होतो. त्यानंतर पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’ अशी स्थिती होते. पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत होतो व नागरिकांना आठवड्यात दोन ते तीन वेळाच पाणी मिळते. तेही पुरेसे नसते. त्यामुळे नागरिकांमध्ये छावणी परिषद प्रशासनाविषयी प्रचंड नाराजी आहे.
---
आंदोलनाशिवाय पाणी सुटेल का?
गेल्या काही वर्षांपासून भिंगारमध्ये पाण्याची समस्या सुरू आहे. प्रत्येक वेळी काही तरी कारणावरून येथे महिना-महिनाभर पाणी सुटत नाही. याचे कारण काय? असा प्रश्न नागरिकांना पडतो. त्यानंतर काही राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आंदोलन करतात. तात्पुरते पाणी सुटते. त्यामुळे आंदोलनाशिवाय भिंगारला कधी पाणी सुटेल का? असा सवाल नागरिक विचारू लागले आहेत.
पाणीप्रश्नाबाबत प्रशासनाची भूमिका जाणून घेण्यासाठी ‘लाेकमत’ प्रतिनिधीने मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
----
छावणी परिषदने फेब्रुवारी महिन्यात केवळ ४, ९, १८, २६ असे चारच दिवस पाणी सोडले. नेमका गोंधळ कुठे होतो. छावणी परिषदेचे कर्मचारीच काही तरी गोंधळ करत असावेत. लष्करी हद्दीत वेळेवर पाणी येते. मग छावणी परिषद नागरिकांनाच वेळेवर पाणी का मिळत नाही. याकडे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लक्ष द्यायला हवे.
-मतीन सय्यद,
अध्यक्ष, राष्ट्रवादी युवक, भिंगार