पित्यानेच दिली मुलाची सुपारी
By Admin | Updated: July 15, 2014 00:46 IST2014-07-14T22:51:51+5:302014-07-15T00:46:15+5:30
अकोले : साम्रद रतनवाडी भागात डोक्यात दगड घालून झालेल्या युवकाच्या खुनाचे रहस्य उलगडण्यात राजूर पोलसांना यश आले आहे.
पित्यानेच दिली मुलाची सुपारी
अकोले : साम्रद रतनवाडी भागात डोक्यात दगड घालून झालेल्या युवकाच्या खुनाचे रहस्य उलगडण्यात राजूर पोलसांना यश आले आहे. मुलाच्या त्रासाला कंटाळल्याने पित्यानेच सुपारी देऊन त्याचा खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. या खून प्रकरणातील अटक आरोपींनी तशी कबुली दिली.
रेडे येथील युवक जालिंदर निवृत्ती बंदावणे (वय ३२) हा २९ जूनपासून घरातून बेपत्ता होता. अकोले पोलिसांत हरवल्याची फिर्याद त्याच्या वडिलांनी दाखल केली होती. त्यानंतर ३० जून ला साम्रद दुर्गम आदिवासी गावात एका अनोळखी इसमाचे प्रेत आढळून आले. त्याचा डोक्यात दगड घालून खून केल्याचे आढळून आल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली.
मयताचे रेखाचित्र ही प्रसिध्द करण्यात आले होते. ९ जुलै रोजी मयताची ओळख पटली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी जालिंदरचे वडील निवृत्ती पांडूरंग बंदावणे यांनी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला.
दरम्यान, याप्रकणी पोलिसांनी भगवान संतू चव्हाण (रा. रेडे) व रमेश लक्ष्मण नवले (रा. गुहिरे) यांना ताब्यात घेतले. मयत युवकाच्या वडिलांनीच ७० हजार रुपये देऊन खून करण्याची सुपारी दिल्याची कबुली आरोपींनी दिली.
खून झाल्यानंतर ३५ हजार रुपये दिले, मात्र खून उडकीस येताच त्यांनी भितीपोटी आत्महत्या केली. दरम्यान या गुन्ह्यात आणखी कुणाचा हात आहे का? याचा तपास पोलीस करत आहे. आरोपींना १९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.
(तालुका प्रतिनिधी)