अपघातात पिता-पुत्र जागीच ठार
By Admin | Updated: May 8, 2016 00:52 IST2016-05-08T00:30:15+5:302016-05-08T00:52:34+5:30
पारनेर : पारनेर-वडनेर हवेली रस्त्यावर गणपती फाट्याजवळ मोटारसायकल व पिकअप व्हॅन यांच्यामध्ये झालेल्या अपघातात वडील व मुलगा हे दोघे जागीच ठार झाले

अपघातात पिता-पुत्र जागीच ठार
पारनेर : पारनेर-वडनेर हवेली रस्त्यावर गणपती फाट्याजवळ मोटारसायकल व पिकअप व्हॅन यांच्यामध्ये झालेल्या अपघातात वडील व मुलगा हे दोघे जागीच ठार झाले तर पत्नी व मुलगी जखमी झाल्याची घटना शनिवारी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली़ वसंत गोरख देशमुख (वय ४०) व आर्यन वसंत देशमुख (वय ७, रा. पळवे खुर्द, ता. पारनेर) असे ठार झालेल्यांची नावे आहेत.
वसंत देशमुख यांची पत्नी स्वाती व मुलगी (नाव समजू शकले नाही) या जखमी झाल्या आहेत़ या भीषण अपघातानंतर सुपा व पारनेर पोलीस यांच्यामध्ये हद्दीचा वाद रंगला़ त्यामुळे आर्यन या लहानग्या मुलाचा मृतदेह तासभर घटनास्थळीच पडून होता़ त्यामुळे पोलिसांविषयी नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त केला़
वसंत देशमुख आपल्या कुटुंबीयांसह दुचाकीवरुन पारनेरहून वडनेर हवेलीकडे जात होते़ त्यांची दुचाकी गणपती फाट्याजवळ आली असता समोरून येणाऱ्या पिकअप व्हॅनने (एम. एच. १६, ई. ११३५) दुचाकीला जोराची धडक दिली. त्यात वसंत देशमुख व त्यांचा मुलगा आर्यन हे जागीच ठार झाले तर त्यांची पत्नी स्वाती व मुलगी या दोघी जखमी झाल्या. जखमींना १०८ रुग्णवाहिकेतून तत्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
(तालुका प्रतिनिधी)
अपघात झालेले ठिकाण सुपा पोलिसांच्या हद्दीत की पारनेर पोलिसांच्या हद्दीत, यावरुन दोन्ही पोलीस ठाण्यांमध्ये तासभर वाद चालले़ अखेरीस तासभरानंतर हे ठिकाण सुपा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याचे निष्पन्न झाले़ त्यानंतर सुपा पोलीस घटनास्थळी दाखल झाले़ मात्र, पोलिसांच्या या हद्दीच्या वादामुळे आर्यन देशमुख या लहानग्याचा मृतदेह सुमारे तासभर अपघातस्थळीच पडून होता. पोलिसांच्या या अंतर्गत धूसफुसीबद्दल मयतांचे नातेवाईक व ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली़