पावसाने पाठ फिरविल्याने शेतकरी चिंतेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:14 IST2021-06-22T04:14:47+5:302021-06-22T04:14:47+5:30
दहिगावने : मान्सूनपूर्व पावसाने समाधानकारक हजेरी लावल्यानंतर मान्सूनही दमदार कोसळला. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणी आणि लागवडीची कामे उरकून घेतली. ...

पावसाने पाठ फिरविल्याने शेतकरी चिंतेत
दहिगावने : मान्सूनपूर्व पावसाने समाधानकारक हजेरी लावल्यानंतर मान्सूनही दमदार कोसळला. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणी आणि लागवडीची कामे उरकून घेतली. सध्या मात्र पावसाने ओढ दिल्याने शेतशिवारात दिमाखदारपणे डोलणाऱ्या पिकांना पाण्याची नितांत गरज भासत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
शेवगाव तालुक्यातील भावीनिमगाव, दहिगावने, शहरटाकळी, ढोरसडे-अंत्रे, देवटाकळी, मजलेशहर आदी भागात जूनच्या पहिल्या आठवड्यातच समाधानकारक पावसाने हजेरी लावली. त्यामुळे परिसरातील बागायती कापूस पिकासह कोरडवाहू जमिनीतील पिकांची शेतकऱ्यांनी पेरणी व लागवडीची कामे आटोपती घेतली. यासाठी शेतकऱ्यांनी आर्थिक संकटाच्या काळातही उसनवारी करत कर्ज काढून सोनेतारण करून हजारो रुपये खर्च केले. सध्या ही पिके शेतात डोलू लागली आहेत. मात्र मागील आठवडाभरापासून पावसाने ओढ दिली आहे.
ज्या शेतकऱ्यांना पाण्याची व्यवस्था आहे, असे शेतकरी पिकांना पाणीही देत आहेत. तरीही कडाक्याच्या उन्हाने आणि जोरदार वाहणाऱ्या वाऱ्यामुळे जमिनीत ओलावा टिकून राहत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनले आहेत. या पाण्यामुळे हे पीक फक्त हिरवे दिसते. मात्र त्याची जोमाने वाढ होऊन विक्रमी उत्पन्न मिळण्यासाठी पिकाच्या या अवस्थेत पावसाची नितांत गरज असल्याचे मत जाणकार शेतकरी व्यक्त करत आहेत.
---
पुन्हा कपाशी लागवड..
यंदा खरीप हंगाम सुरू होण्याआधीच पावसाने हजेरी लावल्याने अनेक शेतकऱ्यांची शेतीमशागतीची कामे करता आली नाहीत. अशा शेतकऱ्यांच्या पेरणी आणि लागवडीची कामेही खोळंबली आहेत. जोराच्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या कपाशीचे बियाणे जमिनीत दबले गेले होते. अशा शेतकऱ्यांनी दुबार कपाशी लागवड केली, तर इतर पिकांचे जमिनीत रुतलेले बियाणे उगवून येण्यासाठीही पावसाची नितांत गरज आहे. आता वेळेवर पाऊस आला नाही, तर शेतकऱ्यांना फटका बसणार आहे.
---
२१ भावीनिमगाव
भावीनिमगाव परिसरात पहिल्या पावसावर पेरणी केलेली पिके अशी डोलू लागली आहेत.