सरकारमध्ये शेतक-यांची मुले हवीत-सचिन पायलट; खांडेकर, गांधी, शेरकर यांना संगमनेरात पुरस्कार प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 18:30 IST2020-01-12T18:28:14+5:302020-01-12T18:30:19+5:30
देशातील नियम व कायदे बनविण्यासाठी विधानसभा आणि लोकसभेत शेतक-यांची मुले पाहिजेत. त्यांनी शेतीप्रधान भारताच्या नागरिकांसाठी चांगले काम केले पाहिजे. महाराष्ट्रात नव्याने आलेल्या महाआघाडी सरकारकडून जनतेच्या असलेल्या अपेक्षा पूर्ण होतील, असे मत राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी व्यक्त केले.

सरकारमध्ये शेतक-यांची मुले हवीत-सचिन पायलट; खांडेकर, गांधी, शेरकर यांना संगमनेरात पुरस्कार प्रदान
संगमनेर : देशातील नियम व कायदे बनविण्यासाठी विधानसभा आणि लोकसभेत शेतक-यांची मुले पाहिजेत. त्यांनी शेतीप्रधान भारताच्या नागरिकांसाठी चांगले काम केले पाहिजे. महाराष्ट्रात नव्याने आलेल्या महाआघाडी सरकारकडून जनतेच्या असलेल्या अपेक्षा पूर्ण होतील, असे मत राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी व्यक्त केले.
मालपाणी लॉन्स येथे झालेल्या स्वातंत्र्यसेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात व हरित क्रांतीचे प्रणेते डॉ.अण्णासाहेब शिंंदे यांच्या जयंती महोत्सवानिमित्त पुरस्कार वितरण सोहळ््यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानसभचे अध्यक्ष नाना पटोले होते. व्यासपीठावर महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात, एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर, डॉ. गिरीश गांधी, आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार लहू कानडे, आमदार डॉ.किरण लहामटे, आमदार हिरामण खोसकर उपस्थित होते.
पायलट पुढे म्हणाले, महाराष्ट्र व राजस्थानचे पुर्वीपासूनचे विश्वासाचे दृढ नाते आहे. महसूलमंत्री थोरात यांच्यातील नम्रता व प्रत्येकाच्या हदयातील असणारे स्थान हे नव्या पिढीसाठी अनुकरणीय आहे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात व डॉ. अण्णासाहेब शिंदे यांनी केलेल्या रचनात्मक व दिशादर्शक कामामुळे नगरचे नाव देशपातळीवर आहे.
खांडेकर, गांधी, शेरकर यांना पुरस्कार
अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने सहकार, साहित्य, समाजसेवा, पर्यावरण या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य असणा-या व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्कार व एक लाख रुपये रोख रक्कम एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांना प्रदान करण्यात आला. डॉ. अण्णासाहेब शिंदे पुरस्कार व एक लाख रुपये रोख रक्कम. पर्यावरणामध्ये डॉ. गिरीश गांधी यांना तर सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार सत्यशील व योगिता शेरकर यांना स्मृतीचिन्ह व एकावन्न हजार रुपयांची रोख रक्कम या पुरस्काराने गौरविण्यात आले.
राज्यात ब्रम्हा, विष्णू, महेश असे विकासाचे सरकार
नाना पटोले म्हणाले, सध्या राज्यात ब्रम्हा, विष्णू व महेश असे विकासाचे सरकार आहे. या सरकारने प्रथम शेतक-यांची कर्जमाफी करुन एक मोठा ऐतिहासीक निर्णय घेतला आहे. मी विधानसभा अध्यक्ष म्हणून जनतेचा प्रतिनिधी म्हणून काम करीत असून जनतेची कामे सरकारकडून करुन घेणार आहे.