तूर मळणीसाठी शेतकऱ्यांची हार्वेस्टरला पसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:36 IST2020-12-15T04:36:54+5:302020-12-15T04:36:54+5:30
चिचोंडी पाटील : नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील परिसरात तूर काढण्यासाठी शेतकऱ्यांची आता हार्वेस्टरला पसंती दिसून येत आहे. मजुरांची वाढती ...

तूर मळणीसाठी शेतकऱ्यांची हार्वेस्टरला पसंती
चिचोंडी पाटील : नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील परिसरात तूर काढण्यासाठी शेतकऱ्यांची आता हार्वेस्टरला पसंती दिसून येत आहे. मजुरांची वाढती रोजंदारी व तुटवड्यामुळे शेतकरी हार्वेस्टरला प्राधान्य देत आहेत.
यंदा पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर तुरीची पेरणी केली. आता या भागात तुरीची मळणी सुरू आहे. मळणीसाठी काढलेली तूर एकत्र करणे, मळणी करणे यासाठी श्रम खर्ची पडतात. त्यासाठी मजूर लागतात. त्याचबरोबर मळणीसाठी प्रतिगोणी तीनशे ते साडेतीनशेप्रमाणे अधिकचा खर्च करावा लागतो. त्याचप्रमाणे काढलेल्या मालाची राखणदारी व नैसर्गिक आपत्तीपासून रक्षण करण्याचे काम करावे लागते. अशा सर्व वेळखाऊ आणि कष्टदायक बाबीतून सुटका करण्यासाठी हार्वेस्टर हा पर्याय उपलब्ध झाला. त्यामुळे अगदी अल्प श्रमात व किफायतशीर खर्च करून तुरीच्या मळणीचे काम होत आहे. तूर काढणीस महिलांना ३५० रुपये, तर पुरुषांना ५५० रुपये रोजंदारी द्यायची तयारी दाखवूनही मजूर मिळत नाहीत. दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना तुरीच्या भुशाचा पशुखाद्य म्हणून उपयोग होत असल्याने अनेक शेतकरी पारंपरिक पद्धतीनेच मजुरांद्वारे मळणी करतात. यंदा मात्र मजुरांच्या तुटवड्यामुळे हार्वेस्टरचा उपयोग करावा लागत आहे. हार्वेस्टरने एक एकर तूर मळणीस एक ते सव्वातास वेळ लागतो. त्यासाठी अडीच हजार रुपयी आकारण्यात येतात.
----
तूर मळणीला आली आहे. तीन-चार दिवसांपासून चिचोंडीसह आसपासच्या गावात शोधूनही मजूर उपलब्ध झाले नाहीत. तुरीचा भुसा पशुखाद्यासाठी उपयोगी पडत असल्यामुळेच ही धडपड सुरू आहे.
-बाजीराव हजारे,
शेतकरी, चिचोंडी पाटील,
----
हार्वेस्टरमुळे शेतकऱ्यांच्या वेळेची आणि श्रमाची बचत होते. पारंपरिक पद्धतीने तूर सोंगणीस लागणाऱ्या मनुष्यबळाचीही आवश्कता नाही. कमी खर्चात तुरीची मळणी होते.
-दीपक मुटकुळे,
हार्वेस्टर चालक
फोटो ओळी : १४ चिचोंडी हार्वेस्टर
चिचाेंडी पाटील परिसरात शेतकरी तूर सोंगणीसाठी हार्वेस्टरला पसंती देत आहेत.