अपहरण करून शेतक-याचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 16:06 IST2018-10-12T16:01:42+5:302018-10-12T16:06:50+5:30
पाथर्डी तालुक्यातील आडगाव येथे गुरूवारी रात्री अपहरण झालेल्या शेतक-यांचा सहा ते सात जणांनी निर्घूण खून करून मृतदेह जाळून टाकण्याचा प्रयत्न केला.

अपहरण करून शेतक-याचा खून
अहमदनगर: पाथर्डी तालुक्यातील आडगाव येथे गुरूवारी रात्री अपहरण झालेल्या शेतक-यांचा सहा ते सात जणांनी निर्घूण खून करून मृतदेह जाळून टाकण्याचा प्रयत्न केला. शुक्रवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास ही घटना उघडकिस आली.
अशोक रभाजी शेंडे (वय ४५) असे खून झालेल्या शेतक-याचे नाव आहे. आडगाव येथे दोन दिवसांपूर्वी शेंडे कुटुंबिय व त्यांच्या शेजारी राहत असलेल्या कुटुंबासोबत वाद झाला होता. याबाबत शेंडे कुटुुंबियांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.पोलीसांनी मात्र या प्रकरणाची काहीच दखल घेतली नाही. गुरूवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास अशोेक शेंडे हे त्यांच्या शेतात गेले तेव्हा सहा ते सात जणांनी त्यांचे अपहरण केले़ ही बाब अशोक यांच्या कुटुंबियांनी समजली तेव्हा त्यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात जाऊन पोलीसांना फिर्याद घेण्याची विनंती पोलीसांनी केली मात्र प्रथम फिर्याद घेण्यास टाळाटाळ केली़ शेंडे कुटुंबयांनी विनंती केली तेव्हा पोलीसांनी त्यांना जबरदस्तीने दोन ते अडिच तास पोलीस ठाण्यात बसवून घेतले. त्यानंतर फिर्याद दाखल केली. अपहरण झालेल्याचा तातडीने शोध घ्यावा, अशी विनंती पोलीसांना केली तेव्हा सध्या मनुष्यबळ कमी आहे. पोलीस उपलब्ध होतील तेव्हा शोध घेऊ, असे पोलीसांनी सांगितले़ अखेर अपहरण झालेल्या अशोक शेंडे याचा खून करून त्यांचा मृतदेह मारेक-यांनी लोहसर-धारवाडी (ता. पाथर्डी) परिसरात आणून टाकला़ हा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आहे.