शेतकऱ्यांच्या विम्यासाठी न्यायालयात जाणार

By Admin | Updated: November 28, 2014 01:14 IST2014-11-28T00:39:40+5:302014-11-28T01:14:27+5:30

अहमदनगर : हवामान आधारित विमा योजनेसाठी जनरल इन्शुरन्स कंपनीने नगर जिल्ह्याची निवड केली आहे. मात्र ही निवड करताना तापमानाच्या सरासरीसाठी नगर जिल्ह्यातील

Farmers insurance can go to court | शेतकऱ्यांच्या विम्यासाठी न्यायालयात जाणार

शेतकऱ्यांच्या विम्यासाठी न्यायालयात जाणार


अहमदनगर : हवामान आधारित विमा योजनेसाठी जनरल इन्शुरन्स कंपनीने नगर जिल्ह्याची निवड केली आहे. मात्र ही निवड करताना तापमानाच्या सरासरीसाठी नगर जिल्ह्यातील ११ तालुक्यांसाठी वेगळा नियम व नगर तालुका आणि अकोले तालुक्यासाठी वेगळा नियम ठेवण्यात आला आहे. या नियमाचा फटका नगर तालुक्यातील शेतकऱ्यांना बसणार असल्याने हे शेतकरी विमा लाभापासून वंचित राहणार आहेत. नगर तालुक्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात माजी खासदार व ज्येष्ठ नेते दादा पाटील शेळके औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करणार आहेत.
राज्य सरकारने हवामानावर आधारित विमा योजनेसाठी विभागातून एक याप्रमाणे पाच जिल्ह्यांची निवड केली आहे. या पाच जिल्ह्यांमध्ये नगर जिल्ह्याचा समावेश आहे. नगर जिल्ह्यासाठी धान्य पिकांमध्ये हरबरा व ज्वारी यांचा समावेश आहे. नगर तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी यासाठी पीक विमा रक्कम भरत नोंदणी केली आहे. पण जनरल इंशुरन्स कंपनीने जिल्ह्यात वेगवेगळे नियम ठेवले आहेत. नगर तालुका व अकोले तालुका यांच्यासाठी तापमानाची अट किमान ७ डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी तापमान गेल्यास विम्यास पात्र अशी अट ठेवली आहे, तर इतर अकरा तालुक्यांसाठी किमान ११ डिग्री सेल्सिअसच्या खाली विम्यास पात्र अशी अट ठेवण्यात आली आहे.
नगर तालुक्याचे तापमान गेल्या कित्येक वर्षात ७ डिग्री पेक्षा कमी गेलेले नाही. यामुळे नगर तालुक्यातील शेतकरी या अटीनुसार विम्यास पात्र होणार नाहीत. नगर तालुक्याच्या शेजारच्या तालुक्यांना वेगळा नियम व नगर तालुक्यासाठी वेगळा नियम ठेवत कंपनी नगर तालुक्यातील शेतकऱ्यांवर विम्याबाबत अन्याय करीत आहेत. विशेष म्हणजे नगर तालुक्यासाठी १० डिग्री तापमानाची शिफारस राहुरी कृषी विद्यापीठाने शासनाकडे व कंपनीकडे केली असताना कंपनी मनमानी करत आहे. या कंपनीच्या अन्यायी धोरणाच्या विरोधात ज्येष्ठ नेते दादा पाटील शेळके मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करणार आहेत.
(प्रतिनिधी)
शेतकरी आभारही मानत नाहीत
नगर तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून देण्यासाठी मी खस्ता खाल्ल्या. शेतकऱ्यांना मागील वर्षी मोठा प्रयत्न करून ३८ कोटी ५० लाखांचा लाभ मिळवून दिला. यापूर्वीही तीन-चार वर्षांपासून मी पीक विम्यासाठी संघर्ष करीत आहे. पण तालुक्यातील शेतकरी साधे आभार मानायला सुद्धा माझ्याकडे फिरकले नाहीत, अशी खंत दादा पाटील शेळके यांनी व्यक्त केली.
तालुक्यातील पुढाऱ्यांना यात रस नाही
नगर जिल्ह्यातीलच काय पण नगर तालुक्यातील पुढाऱ्यांना व जिल्हा बँकेलाही शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून देण्यात रस नाही. तालुक्यातील लोकप्रतिनिधी फक्त मला शिव्या शाप देण्याचेच काम करतात. पण शेतकऱ्यांच्या पीक विम्यासाठी त्यांचे योगदान नाही, मुळात त्यांना विम्यातले काही कळत नाही अशी टीका शेळके यांनी केली. विमा मिळाल्यानंतर मात्र श्रेय घेण्यात सगळे पुढे पळतात असेही शेळके म्हणाले.

Web Title: Farmers insurance can go to court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.