श्रीगोंदा : साईकृपा साखर कारखान्याने ऊस बिलाचे पैसे न दिल्याने करमाळा तालुक्यातील सुमारे १०० ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे श्रीगोंद्यात मंगळवारी आठव्या दिवशी धरणे आंदोलन सुरूच होते. राजाभाऊ कदम यांच्या नेतृत्वाखाली आठ दिवसापूर्वी २०१४-१५ गाळप हंगामात गाळप केलेल्या उसाच्या बिलासाठी शेतकऱ्यांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन चालविले आहे. साईकृपा साखर कारखान्याने ६५ शेतकऱ्यांना उस बिलापोटी धनादेश दिले. जोपर्यंत बँकेत धनादेश पास होत नाहीत व इतर शेतकऱ्यांना धनादेश मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे. राजाभाऊ कदम म्हणाले, आम्ही गरीब माणसे आहोत. आम्हाला कामाचे दाम मिळावे म्हणून आम्ही शांततेच्या मार्गाने शासनाच्या दारासमोर लढा सुरू केला आहे. साईकृपाकडील थकीत ऊस बिलासाठी १८ जानेवारीपासून मांडवगण गटातील रूईखेल, घोगरगाव, रमजान चिंचोली, थिटे सांगवी, चवरसांगवी येथील शेतकऱ्यांनी नगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे. या निवेदनावर अरुण तरटे, बाबा उगले, दीपक भोस, राजेंद्र भोस, आप्पा कसाब यांच्या सह्या आहेत. (तालुका प्रतिनिधी)
‘साईकृपा’च्या विरोधात शेतकऱ्यांचे धरणे सुरूच
By admin | Updated: January 12, 2016 23:33 IST