शेतकरी संघटना लढविणार १०० जागा
By Admin | Updated: June 8, 2024 21:40 IST2014-09-17T00:01:54+5:302024-06-08T21:40:45+5:30
अहमदनगर : आघाडीने शेतकरी हिताचा एकही निर्णय घेतला नाही तर विरोधात असलेल्या सेना-भाजपा युतीनेही नाकर्तेपणा सिध्द केला़

शेतकरी संघटना लढविणार १०० जागा
अहमदनगर : सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने शेतकरी हिताचा एकही निर्णय घेतला नाही तर विरोधात असलेल्या सेना-भाजपा युतीनेही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून नाकर्तेपणा सिध्द केला़ येणाऱ्या काळात सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शेतकरी संघटना पूर्ण ताकदीने विधानसभा निवडणुकीत उतरणार असल्याची घोषणा मंगळवारी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी केली़ संपूर्ण राज्यात शेतकरी संघटना १०० उमेदवार देणार असून, मतदारसंघनिहाय समविचारी व सक्षम उमेदवार मिळाले तर २८८ जागा लढविण्याची तयारी असल्याचेही त्यांनी पत्रकारपरिषदेत स्पष्ट केले़ नगर येथे झालेल्या बैठकीत रघुनाथदादा पाटील यांनी पुणे व नगर जिल्ह्यातील १० उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली़ बुधवारी औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील पहिली यादी जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले़ तर बीड लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीत कालिदास आपेट हे संघटनेकडून उमेदवारी करणार आहेत़ गेल्या पंधरा वर्षांत राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने शेतकऱ्यांसाठी काहीच ठोस निर्णय घेतले नाही़ त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या आजही सुरूच आहेत़ केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या़ मात्र, त्यांनीही शेतकऱ्यांची निराशा केली़ शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला दर मिळू लागल्यानंतर केंद्र सरकारने इजिप्त व पाकिस्तान येथून कांद्याची आयात केली़ कांद्यासह बटाट्यावरही निर्यातबंदी घातली़ त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे़ मागील निवडणुकीत स्व़ बाळासाहेब ठाकरे यांनी युतीचे सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी व वीजबिल माफीची घोषणा केली होती़ स्व़ बाळासाहेबांच्या या विधानाचा उद्धव ठाकरे यांना विसर पडला असून, त्यांना फक्त बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा हवा आहे, अशी टीका यावेळी पाटील यांनी केली़ राज्यात ५६ हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे़ भ्रष्ट सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनाही कंटाळलेल्या जनतेला तिसरा सक्षम पर्याय देण्यासाठी निवडणूक लढविणार असल्याचे पाटील म्हणाले़