महात्मा फुले कृषी विद्यापीठात किसान आधार संमेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 20:46 IST2017-09-17T20:45:48+5:302017-09-17T20:46:02+5:30
राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात २५ ते २९ सप्टेंबर या कालावधीत भव्य किसान आधार संमेलनाचे आयोजन केले आहे.

महात्मा फुले कृषी विद्यापीठात किसान आधार संमेलन
लोकमत न्यूज नेटवर्क
राहुरी : महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात २५ ते २९ सप्टेंबर या कालावधीत भव्य किसान आधार संमेलनाचे आयोजन केले आहे. या किसान आधार संमेलनात शेतक-यांसाठी कृषी प्रदर्शन, विविध पिकांचे प्रात्यक्षिके, पशुप्रदर्शन आणि विविध कृषी विषयांवर व्याख्याने व चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.
या किसान आधार संमेलनातील पीक प्रात्यक्षिकांमध्ये तेलबिया, कडधान्य, तृणधान्य, चारा आणि नगदी पिकांमधील विविध ३० पिकांचे १०१ वाण, १४ भाजीपाला पिकांचे २८ वाणांचे प्रात्यक्षिके बघता येणार आहे. या व्यतिरिक्त गायी, म्हैस, शेळी, मेंढी, कोंबड्याच्या विविध जाती, तसेच कृषी अवजारे शेतकºयांना पाहण्यास मिळणार आहे. प्रदर्शनस्थळी कृषी विद्यापीठांनी विकसित केलेले तंत्रज्ञान, कृषी विभागाच्या योजना, विविध खासगी कंपन्यांनी विकसित केलेले तंत्रज्ञान शेतक-यांना एकाच दालनाखाली पाहण्यास मिळणार आहे. याचबरोबर सिंचन प्रणाली, निचरा पद्धती, माती परीक्षण प्रात्यक्षिके, एकात्मिक शेती पद्धतीचे मॉडेल, गांडूळ खत उत्पादन प्रकल्प, मधुमक्षिका पालन, जिवाणू खते, जैविक कीड नियंत्रण, एकात्मिक कीड व्यवस्थापन इत्यादी कृषी तंत्रज्ञान पाहण्याची व जाणून घेण्याची संधी यानिमित्त उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याप्रसंगी प्रत्येक दिवशी विविध विषयांवर कृषी शास्त्रज्ञांचे आणि प्रगतिशील शेतक-यांचे व्याख्याने आणि चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
किसान आधार संमेलनास राज्यातील आणि जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी भेट देऊन तंत्रज्ञान आत्मसात करावे, तसेच शास्त्रज्ञ व प्रगतिशील शेतकºयांशी सुसंवाद साधावा, असे आवाहन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.के.पी. विश्वनाथा यांनी केले. हे किसान आधार संमेलन शेतकरी, उद्योजक, विद्यार्थी या सर्वांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या किसान आधार संमेलनात सर्वांना विनामूल्य प्रवेश देण्यात येणार असून, २५ ते २९ सप्टेंबरदरम्यान सकाळी ९ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहील, अशी माहिती संचालक विस्तार शिक्षण डॉ. किरण कोकाटे यांनी दिली.