काही दिवसांपासून पुणतांबा व परिसरात वीज वितरण कंपनीकडून वारंवार वीज पुरवठ्यात विस्कळीतपणा असल्याने ऑनलाईन परीक्षा, ऑनलाईनचे वर्ग प्रभावित झाले आहेत. वाड्यावस्त्यांवरील शेतकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याबरोबर जनावरांसाठी पाणी कसे आणायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. तर गावठाण परिसरातील विजेवर चालणारे व्यवसाय पूर्णतः कोलमडले असून आधीच कोरोनामुळे व्यवसाय बसले असून त्यामुळे आधीच नागरिकांचे हाल होत आहेत. त्यात भरमसाठ वीजबिल आणि विस्कळीत वीजपुरवठा होत असल्याने नागरिक, व्यापारी वर्ग हतबल झाले आहेत.
या विजेच्या लपंडावामुळे गावाला पाणीपुरवठा करणारी योजना प्रभावित झाली आहे. तर मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या पूर्ण क्षमतेने चार्ज होत नसल्याने दूरसंचार सेवासुद्धा कोलमडली जात असल्याने डॉक्टर, मेडिकल या सेवांबरोबर संपर्क करण्यात अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे या विजेच्या लपंडावामुळे शेतकरी त्रस्त तर नागरिक हतबल झाले आहेत.
....................
जनावरांना पाणी नाही. रात्री-बेरात्री लाईट जाते. वाड्यावस्त्यावर राहत असल्याने जीव मुठीत घेऊन रहावे लागत आहे.
-प्रभाकर बोरबने, शेतकरी
.........................
उन्हाचा पारा वाढत आहे. त्यात वीज नसल्याने पंखे बंद असल्याने घरात बसवत नाही. मुलांच्या ऑनलाईन क्लासेसला अडचणी येत आहे.
-सुदेश लोंढे, नागरिक
...............
लाईनवर काही बिघाड झाल्यास ट्रिप होणाऱ्या ऑटोमॅटिक सिस्टीममध्ये बिघाड झाल्याने पुणतांबा गावठाण व परिसरातील वीज बंद आहे. बिघाड निघताच वीजपुरवठा सुरळीत होईल.
-शितलकुमार जाधव, सहाय्यक अभियंता, पुणतांबा सबस्टेशन