कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन; राज्यभरातील शेतकरी पुणतांब्यात दाखल
By Admin | Updated: May 26, 2017 14:01 IST2017-05-26T14:00:14+5:302017-05-26T14:01:31+5:30
शुक्रवारी सकाळीच पुणे, नगर, नाशिक, धुळे, जळगाव येथील शेतकरी पुणतांबा येथे दाखल झाले आहेत़

कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन; राज्यभरातील शेतकरी पुणतांब्यात दाखल
आॅनलाईन लोकमत
राहाता, दि़ 26 - शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, यासाठी गुरुवारपासून सुरु केलेल्या धरणे आंदोलनाला राज्यभरातून शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत आहे़ शुक्रवारी सकाळीच पुणे, नगर, नाशिक, धुळे, जळगाव येथील शेतकरी पुणतांबा येथे दाखल झाले आहेत़
१ जूनपासून शेतकरी संपावर जाणार आहेत़ तत्पूर्वी सरकारला शेतकऱ्यांच्या भावनांचे गांभीर्य लक्षात यावे, यासाठी पुणतांबा शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन सुरु केले आहे़
संपादरम्यान मुंबईला जाणारा भाजीपाला अडविण्याचा इशारा शेतकऱ्यांनी पुणतांबा येथे सुरु असलेल्या धरणे आंदोलनात दिला आहे़ किसान क्रांतीचे राज्य प्रवर्तक धंनजय जाधव, कृषी कन्या प्रियांका जोशी, विजय जाधव, डॉ़ अजित नवले, मंगला चव्हाणके, सिमा नरवडे, अजित ढवळे, सोनाली गमे, अनिल घनवट आदींनी या आंदोलनाचे नेतृत्व केले आहे़ या आंदोलनात सहभागी होण्यासाठी नगरसह पुणे, जळगाव, नाशिक, धुळे आदी जिल्ह्यांमधील शेतकरी पुणतांबा येथे दाखल होत आहेत़ त्यामुळे या आंदोलनाची धार पुढील दोन दिवसात वाढणार आहे़
दरम्यान आज खासदार सदाशिव लोखंडे आंदोलकांची भेट घेणार आहेत़ तर ३० रोजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत शेतकऱ्यांची चर्चा करणार आहेत़