एफआरपीसाठी शेतकरी संघटना आक्रमक
By Admin | Updated: September 20, 2015 00:49 IST2015-09-20T00:38:07+5:302015-09-20T00:49:49+5:30
श्रीगोंदा : एफआरपीप्रमाणे बाकी असलेली रक्कम ऊस उत्पादकांना मिळावी, यासाठी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली २१ सप्टेंबरपासून बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार

एफआरपीसाठी शेतकरी संघटना आक्रमक
श्रीगोंदा : तालुक्यातील ‘साईकृपा’, ‘नागवडे’ व कुकडी साखर कारखान्यांकडील एफआरपीप्रमाणे बाकी असलेली रक्कम ऊस उत्पादकांना मिळावी, यासाठी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली २१ सप्टेंबरपासून बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचे शेतकरी संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य अनिल घनवट यांनी सांगितले.
सन २०१४-१५ च्या गळीत हंगामात गाळप झालेल्या उसाचे किमान एफआरपीनुसार पेमेंटही ऊस उत्पादकांना मिळालेले नाही. नागवडे साखर कारखान्यांकडून २०२.०० रु. प्रति टन व कुकडी साखर कारखान्याकडून ८३.०० रु. प्रति टन प्रमाणे रक्कम ऊस उत्पादकांना येणे आहे.
साईकृपा शुगर अॅण्ड अलाईड इंडस्ट्रीज फेज- २, हिरडगाव या साखर कारखान्याने जानेवारी २०१५ पासून पुढे गाळप केलेल्या उसाचा एक रुपयाही ऊस उत्पादकांना दिलेला नाही. श्रीगोंदा, शिरूर, दौंड, पारनेर, आष्टी, नगर व करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी गळितासाठी ऊस दिला आहे. परंतु या शेतकऱ्यांना अद्याप पैसे मिळाले नाहीत.केंद्र शासनाने साखर कारखान्यांना एफआरपीची रक्कम देता यावी, यासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले आहे. तरीही अद्याप ऊस उत्पादकांना हक्काचे व कष्टाचे पैसे देण्यास साखर कारखान्यांकडून टाळाटाळ होत आहे, असे घनवट म्हणाले.
एफआरपीची रक्कम मिळण्यास अधिक दिरंगाई होऊ नये, यासाठी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर २१ सप्टेंबर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.
‘साईकृपा’सह ‘नागवडे’ व कुकडी साखर कारखान्यांच्या ऊस उत्पादकांनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन घनवट यांनी केले आहे. (तालुका प्रतिनिधी)