मर्जीतील व्यापाऱ्यांना चिंचाच्या लिलावाचा निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:40 IST2021-02-05T06:40:42+5:302021-02-05T06:40:42+5:30
श्रीरामपूर: सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतीही जाहिरात न देता केवळ मर्जीतल्या व्यापाऱ्यांना निरोप देऊन कोल्हार ते बेलपिंपळगाव दरम्यान चिंच फळांचा ...

मर्जीतील व्यापाऱ्यांना चिंचाच्या लिलावाचा निरोप
श्रीरामपूर: सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतीही जाहिरात न देता केवळ मर्जीतल्या व्यापाऱ्यांना निरोप देऊन कोल्हार ते बेलपिंपळगाव दरम्यान चिंच फळांचा लिलाव केल्याचा आरोप बेलापूर येथील २५ व्यापाऱ्यांनी केला आहे. हा लिलाव तातडीने रद्द करावा, अन्यथा बांधकाम विभागाच्या येथील कार्यालयासमोर उपोषण छेडण्याचा इशारा व्यापाऱ्यांनी दिला आहे.
सार्वजनिक बांधकामचे संगमनेर येथील कार्यकारी अभियंता आर. आर. पाटील, प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांना निवेदन देण्यात आले आहे.
कोल्हार ते बेलपिंपळगाव दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतीत चिंचेची अनेक झाडे आहेत. दरवर्षी या झाडांवरील फळांचा लिलाव जाहिरात देऊन केला जातो; मात्र यावेळी मर्जीतील दोन -चार व्यापाऱ्यांना बोलावून इतरांना अंधारात ठेवून लाखो रुपयांचा लिलाव अवघ्या काही हजारात देण्यात आल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
चिंचांचा लिलाव किमान एक लाख रुपयांना होणे अपेक्षित आहे. सर्व व्यापाऱ्यांना बोलावून त्यांना समाविष्ट करून नव्याने लिलाव प्रक्रिया राबवावी. सरकारचे उत्पन्न बुडविण्याचा प्रयत्न करू नये, असे व्यापाऱ्यांनी म्हटले आहे.
निवेदनावर मुनीर बागवान, निसार बागवान, जाकीर हुसेन बागवान, राजू शिंदे, द्रोणा थोरात, रईस बागवान, युनूस बागवान, कय्युम बागवान, हुसेन बागवान, हसन बागवान, राजेंद्र शिक्रे, रवींद्र गायकवाड, हमीद आतार, शफीक बागवान आदींच्या सह्या आहेत.
------------