मोहरमनिमित्त रूबाबात सजले नवसाचे वाघ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 11:05 IST2019-09-08T11:03:54+5:302019-09-08T11:05:11+5:30
गळ्यात फुलांच्या माळा़ डोक्यावर मोर पिसारा़... दंडाला हिरवा पंचा आणि वाद्यांचा गजर असा रूबाब अन् मर्दानी थाटात शनिवारी (दि़७) मोहरमच्या सातव्या दिवशी शहरातील कोठला, दाळमंडई परिसरात नवसाचे वाघ सजले़

मोहरमनिमित्त रूबाबात सजले नवसाचे वाघ
अहमदनगर: गळ्यात फुलांच्या माळा़ डोक्यावर मोर पिसारा़... दंडाला हिरवा पंचा आणि वाद्यांचा गजर असा रूबाब अन् मर्दानी थाटात शनिवारी (दि़७) मोहरमच्या सातव्या दिवशी शहरातील कोठला, दाळमंडई परिसरात नवसाचे वाघ सजले़
मोहरमनिमित्त नवासाचे वाघ सजविण्याची जुनी परंपरा आहे़ शनिवारी अगदी १ वर्षे वय असलेल्या मुलापासून ते २० वर्षांचे तरूणही नवसाचे वाघ बनून धार्मिक परंपरेत सहभागी झाले होते़ मोठे इमाम हसन आणि छोटे इमाम हुसेन यांची ताबूत सवारी नवसाला पावते अशी लोकश्रद्धा आहे़ त्यामुळे सर्वधर्मीय भाविक येथे नवस (मन्नत) बोलतात़ माझ्या मुलाला कुठलाही आजार होऊ नये, तो वाघासारखा चपळ आणि तंदुरूस्त रहावा असे मागणे मागून मुलाला वाघासारखे तयार करून वाजतगाजत सवारींच्या दर्शनासाठी नेले जाते़
मोहरमच्या सातव्या, आठव्या आणि नवव्या असे तीन दिवस नवसाचे वाघ सवारींच्या दर्शनासाठी नेले जातात़ मुलींसाठी केलेला नवस फेडण्यासाठी त्यांच्या डोक्यावर फुले ठेवून सवारींच्या दर्शनासाठी नेले जाते़
मोहरमनिमित्त नवसाचे वाघ सजविणारे रंगारी, वादक, कापड विक्रेते, फुले व प्रसाद विकणा-या व्यावसायिकांसह छोट्या मोठ्या वस्तू विकणा-यांनाही दहा दिवस चांगला रोजगार उपलब्ध होतो़