बनावट विवाह लावणारी टोळी मोकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:40 IST2021-02-05T06:40:58+5:302021-02-05T06:40:58+5:30
श्रीरामपूर पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावत चार महिला आरोपींना अटक केली होती. त्यामध्ये सुजाता खैरनार, ज्योती ब्राम्हणे, अनिता कदम ...

बनावट विवाह लावणारी टोळी मोकाट
श्रीरामपूर पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावत चार महिला आरोपींना अटक केली होती. त्यामध्ये सुजाता खैरनार, ज्योती ब्राम्हणे, अनिता कदम (रा. सर्व दत्तनगर, ता. श्रीरामपूर) व जयश्री ठोंबरे (कोल्हापूर) यांचा समावेश आहे. सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकरणात १० ते २० आरोपी असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. मात्र, त्यांच्यापर्यंत अजूनही पोहोचता आलेले नाही.
मालेगाव येथील मोतीनगर भागातील एक विवाहिता दत्तनगर येथे बहिणीकडे आली होती. केटरिंगच्या कामानिमित्त ती येथून मध्यप्रदेशातील इंदोर येथे गेली. तेथे ती अडकल्याची फिर्याद विवाहितेच्या पतीने श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात नोंदविली होती. पोलिसांना तिच्या सुटकेसाठी विनंती करण्यात आली. मात्र, हा सर्व बनाव असून तरुणांना विवाहबंधनात अडकवून त्यांची आर्थिक फसवणूक करण्याचा प्रकार असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी विवाहितेची सोडवणूक करीत तिच्यावर गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान, या राज्यव्यापी टोळीमध्ये औरंगाबाद, अमरावती, अकोला, मध्यप्रदेश येथील महिला आरोपींचा समावेश असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. अटकेतील महिला आरोपींकडून पोलिसांना पुरेशी माहिती उपलब्ध होताच त्यांच्यापर्यंत पोहोचता येईल, अशी माहिती तपासी अधिकारी कृष्णा घायवट यांनी दिली.
या टोळीने अनेक तरुणांची फसवणूक केली आहे. मात्र, प्रतिष्ठेला धक्का लागेल या भीतीने पीडित तरुण समोर येत नाहीत, असे पोलिसांचे म्हणणे आहे. प्रारंभी या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायवट यांच्याकडे होता. आता सहायक पोलीस निरीक्षक संभाजी पाटील यांच्याकडे तपास सोपविण्यात आला आहे.
-------------
बनावट नवरीला डांबून ठेवले
विवाहेच्छुक तरुणांशी बनावट नवरीचा विवाह लावून द्यायचा व नंतर दागिने व रोकड घेऊन पसार व्हायचे असे या गुन्ह्याचे स्वरुप असते. तरुणांकडून विवाहासाठी काही आगाऊ पैसेही घेतले जातात. मात्र, आता या बनावट नवरींना तरुणाकडील कुटुंबीय डांबून ठेवत असल्याचे समोर आले आहे. श्रीरामपूर येथील एक तरुणी राजस्थान येथे अडकली आहे. तिने सोडवणुकीसाठी संपर्क साधला आहे. पोलीस लवकरच राजस्थानला रवाना होणार आहेत.