पाणीप्रश्न सोडविण्यात अपयश
By Admin | Updated: August 17, 2014 23:34 IST2014-08-17T23:04:36+5:302014-08-17T23:34:12+5:30
पारनेर : पारनेर तालुक्याच्या नशिबात अजूनही पाण्याचे दुर्भिक्ष्य कायम आहे़ तालुक्याला अनेक आमदार मिळाले़ मात्र, पिण्यासाठी व शेतीचा पाणी प्रश्न सुटला नाही़

पाणीप्रश्न सोडविण्यात अपयश
पारनेर : पारनेर तालुक्याच्या नशिबात अजूनही पाण्याचे दुर्भिक्ष्य कायम आहे़ तालुक्याला अनेक आमदार मिळाले़ मात्र, पिण्यासाठी व शेतीचा पाणी प्रश्न सुटला नाही़ केवळ सभामंडप व रस्त्याचे प्रश्न सोडविण्यालाच विकास म्हटल्याने पाणी योजनांकडे दुर्लक्षच होत आहे.
पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघात नगर तालुक्यातील चास व निंबळक हे दोन जिल्हा परिषद गट समाविष्ट झाले आहेत. पारनेर तालुक्यात विकासाचा डांगोरा पिटला जात असला तरी गावांमध्ये सभामंडप व रस्ते बांधणे एवढ्यापुरतीच लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांच्या मागणीची मजल गेली आहे. पिंपळगाव जोगाचे पाणी पारनेर, कान्हुरपठार,भाळवणी व नगर तालुक्यातील गावांना मिळवून देण्याच्या घोषणा स्थानिक नेते करतात़ दोन टी.एम.सी. पाणी पठार भागातील शेतीसाठी देण्याचे आश्वासन दिले जाते़ पण प्रत्यक्षात याकडे दुर्लक्ष झाले आहे़ त्यामुळे पारनेरसह नगर तालुक्याला वरदान ठरणारी साकळाई योजना फक्त निवडणुकीपुरतीच चर्चेत येते. दुसरीकडे कुकडी प्रकल्पात असणाऱ्या चौदा गावांमध्येच क्षमतेपेक्षा केवळ पन्नास टक्केच पाणी या गावांना मिळत आहे. त्यामुळे शेतीसाठी आवर्तन उशिरा सोडले तर या भागातील पिकेही मान टाकतात अशी अवस्था आहे. या पाणीप्रश्नावर कोणीच बोलायला तयार नाही.
विसापूर धरणातून पारनेर, सुपा, म्हसणे, बाबुर्डी, वडनेर हवेलीसह वीस गावांसाठी पिण्याच्या पाण्याची पाणी योजना,भाळवणीसह चौदा गावांची पाणी योजना होणे आवश्यक आहे़ मात्र, भाळवणीच्या नळयोजनेचे पाईप चोरीला जाऊन शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. पारनेर तालुक्यात दुष्काळ पडला की सुमारे शंभर गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरु होतात़ पण पारनेर तालुका कायमस्वरुपी टँकरमुक्त होण्यासाठी मुळा धरण, विसापूर तलाव, कुकडी कालवा, पिंपळगाव जोगाचे पाणी यांचा योग्य वापर करुन नळयोजना आखणे जरुरीचे आहे. सुपा एम.आय.डी.सी.त जपानी हब होणार आहे़यामुळे रोजगाराला चालना मिळेल़ मात्र, ढवळपुरी भागात मिनी एम.आय.डी.सी.चे स्वप्न दाखविले जात आहे़ मात्र, वरिष्ठ पातळीवर कोणतीच हालचाल नााही.
(तालुका प्रतिनिधी)