तोंडाला मास्क, मात्र अंतर कोण पाळतेय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:44 IST2021-09-02T04:44:32+5:302021-09-02T04:44:32+5:30
---------------- लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : जिल्हा रुग्णालयात कोरोनाशिवाय इतर रुग्णांची गर्दी वाढत आहे. केस पेपर काढण्यासाठी मोठीच मोठी ...

तोंडाला मास्क, मात्र अंतर कोण पाळतेय?
----------------
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : जिल्हा रुग्णालयात कोरोनाशिवाय इतर रुग्णांची गर्दी वाढत आहे. केस पेपर काढण्यासाठी मोठीच मोठी रांगही लागते. रुग्ण आणि रुग्णांचे नातेवाईक तोंडाला मास्क लावतात, मात्र सोशल डिस्टन्सिंग कुठेही पाळले जात नाही. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट कशी रोखणार? असा प्रश्न पडतो आहे.
जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या रोज सातशे ते आठशे आहे. कोरोना रुग्ण वाढणाऱ्या मोजक्या शहरात अहमदनगर चौथ्या, पाचव्या क्रमांकावर असते. नियमांचे पालन करा, असे आरोग्य यंत्रणेमार्फत नेहमीच आवाहन केले जाते. असे आवाहन करणाऱ्या यंत्रणेपैकी जिल्हा रुग्णालय ही एक यंत्रणा आहे. कोरोनाचे रुग्ण कमी झाल्याने इतर आजारावर उपचार घेणारे, कोरोना चाचणी करणारे, लसीकरण करणाऱ्यांची जिल्हा रुग्णालयात गर्दी होती. त्यामुळे केस पेपर काढण्यासाठी बुधवारी मोठी गर्दी आढळून आली. दिव्यागांना प्रमाणपत्र देण्याचा बुधवारचा दिवस खास राखीव असते. त्यामुळे त्यांचीही गर्दी होते. सर्वांच्याच तोंडावर मास्क पहायला मिळाले. मात्र सामाजिक अंतराचे पालन केले जात नसल्याचे आढळून आले. जिल्हा रुग्णालयातील विविध विभागातही अशीच गर्दी आढळून आली.
-------------
ओपीडी हाऊसफुल्ल
कोरोनाचे रुग्ण कमी असल्याने सध्या इतर आजारांचे रुग्ण वेगवेगळ्या तपासणी करण्यासाठी येत आहेत. त्यामुळे सर्वच विभागात गर्दी दिसून आली. रांगेत उभे राहताना सर्वच एकमेकांना खेटून असतात. त्यामुळे सामाजिक अंतर पाळलेले दिसत नाही.
------------
तापाचे रुग्ण वाढले
सध्या कधी ढगाळ हवामान तर कधी पाऊस सुरू असतो. त्यामुळे नगर शहरात तापाचे रुग्ण आढळून येत आहेत. अशा रुग्णांचीही गर्दी पाहायला मिळते आहे. याशिवाय काही संसर्गजन्य आजारही बळावले आहेत. त्यामुळे सामाजिक अंतर राखणे आवश्यक ठरले आहे.
------------
रुग्णालयेच ठरू नयेत सुपर स्प्रेडर
आरोग्य यंत्रणेमार्फतच नियम पाळण्याचे आवाहन केले जाते. जिल्हा रुग्णालयाकडूनही नेहमीच आवाहन केले जाते. तसेच रुग्ण, त्यांचे नातेवाईक यांनाही सांगितले जाते. मात्र सामाजिक अंतराचे नियम कोणीच पाळत नाहीत. लसीकरण, चाचणी, केस पेपर काढण्यासाठी गर्दी करून असतात. त्यामुळे हीच रुग्णालयेच सुपर स्प्रेडर ठरू नयेच, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
-----------
जिल्हा रुग्णालयात मास्क घातल्याशिवाय कोणालाच प्रवेश दिला जात नाही. त्यावर आमचे लक्ष असते. आपला नंबर लागावा यासाठी नागरिक गर्दी करतात. रांगेत उभे राहताना अंतर पाळत नाहीत. मात्र सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसल्यानंतर लोकांना नियम पाळण्याचे आवाहन केले जाते, असे जिल्हा रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
----
फोटो- ०१ सिव्हिल हॉस्पिटल
जिल्हा रुग्णालयात केस पेपर काढण्यासाठी रांगेत असलेले नागरिक. कुठेही सामाजिक अंतर पाळलेले दिसत नाही.
डमी क्रमांक - १११९