गोदावरी नदीकाठच्या परिसराला अतिवृष्टी झाल्यास पुराचा असतो धोका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:22 IST2021-07-29T04:22:22+5:302021-07-29T04:22:22+5:30

कोपरगाव : शहरासह तालुक्याला गोदावरी नदी वर्षानुवर्षे वरदान ठरत आहे. या नदीमुळे कोपरगाव शहर व तालुक्यातील नदीकाठच्या गावांना ...

Extreme levels of flood danger were announced in the Godavari area. | गोदावरी नदीकाठच्या परिसराला अतिवृष्टी झाल्यास पुराचा असतो धोका !

गोदावरी नदीकाठच्या परिसराला अतिवृष्टी झाल्यास पुराचा असतो धोका !

कोपरगाव : शहरासह तालुक्याला गोदावरी नदी वर्षानुवर्षे वरदान ठरत आहे. या नदीमुळे कोपरगाव शहर व तालुक्यातील नदीकाठच्या गावांना समृद्ध केले आहे. पावसाळ्यात नदी वाहती राहिल्यास परिसरातील शेती समृद्ध होते. मात्र, अतिवृष्टी झाल्यास नदीला आलेल्या पुरामुळे रुद्रावतार धारण केल्याने नदीकाठच्या परिसराची दाणादाण होऊन नागरिकांची चांगलीच धावपळ होते. प्रसंगी धोकादेखील निर्माण होतो.

गोदावरी नदीचा उगम हा नाशिक जिल्ह्यातून होतो. या नदीला येणारे पाणी हे नाशिक जिल्ह्यातील धरण समूहातून येते. हे सर्व पाणी नांदूरमध्यमेश्वर धरणात एकत्र होते, त्यानंतर गोदावरीत पाणी सोडले जाते. पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण झाल्यास कोपरगाव शहरातील नदीकाठच्या उपनगरांना तसेच तालुक्यातील ग्रामीण भागातील गावांना मोठा फटका बसतो. हजारो कुटुंबाना पूरपरिस्थितीत सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे लागते. मागील दहा- बारा वर्षात अशी परिस्थिती चार ते पाच वेळा उद्भवली होती. दोन वर्षापूर्वी ऑगस्ट २०१९ मध्येदेखील गोदावरी नदीला पूर आल्याने चांगलीच दाणादाण झाली होती. त्यावेळी प्रशासनातील सर्वच विभागांच्या अधिकाऱ्यांची, कर्मचाऱ्यांची तसेच स्वयंसेवी संस्था तसेच सयंस्वेकांची चांगलीच दमछाक झाली होती.

.............

या उपनगरांना बसतो फटका

कोपरगाव शहरातील नदीकाठच्या बाजारतळ, सराफ बाजार, पांडेगल्ली, इंदिरानगर, गोरोबानगर, दत्तनगर, महादेवनगर, सर्व्हे नं. १०५, मोहिनीराजनगर, बेट परिसर, बसस्थानक, मुख्यरस्ता, कालेमळा, सप्तर्षी मळा, बजरंगनगर, जुनी मामलेदार कचेरी, खंदक नाला, गोकुळनगरी या परिसरात पुराचे पाणी शिरते. त्यामुळे येथील सर्व घरे पाण्यात असतात.

.............

या गावांना बसतो फटका

कोपरगाव तालुक्यातील मुर्शतपूर, धारणगाव, वडगाव, बक्तरपुर, चासनळी, मोर्वीस, मळेगावथडी, हिंगणी, सांगवी भुसार, कुंभारी, मायगाव देवी, माहेगाव देशमुख, जेउरकुंभारी, जेऊर पाटोदा, डाउच खुर्द, डाउच बुद्रूक, संवत्सर, मनाई वस्ती, कोकमठाण, सडे, वारी, शिंगवे, पुणतांबा, रस्तापूर, बोरबने वस्ती, बनकर वस्ती, कातनाला परिसरातील हजारो घरात गोदावरी नदीचे पाणी शिरते. त्यामुळे येथील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे लागते.

.............

गोदावरी नदीला पूर आल्यानंतर आमच्या संपूर्ण परिसरात पाणी असते. घरेदेखील पाण्यात असतात त्यामुळे खूप नुकसान होते. पूर असताना इतरत्र स्थलांतरित व्हावे लागते. पूर ओसरल्यानंतर घरात मातीमिश्रित गाळ, काटेरी झुडपे वाहून आलेली असतात. त्यामुळे दरवर्षीच्या पावसाळ्यात चार महिने आम्ही भीतीच्या सावटाखाली असतो.

- मंगेश मोरे, रहिवासी, महादेव नगर

..................

आम्ही गोदावरी नदीकाठी वसलेल्या जवाहर नगरमध्ये राहतो. हा परिसर नदीपात्राच्या १ हजार फूट अंतरावर आहे. पावसाळ्यात नदीला १ लाख क्यूसेकपर्यंत जरी पाणी सोडण्यात आले. तर आमच्या परिसरातील नागरिक तणावात असतात. नदीला पूर आलाच तर आमची घरे छतापर्यंत पाण्यात बुडालेली असतात. अशा वेळी आमचे गावातील जिल्हा परिषद शाळेत स्थलांतर करण्यात येते.

- गणेश सोळसे, रहिवासी वारी ता. कोपरगाव

................

फोटोओळी -

गोदावरी नदीला पूर आल्यानंतर नदीकाठचा हा संपूर्ण परिसर पाण्यात असतो.

..............

फोटो२८- गोदावरी पूर क्षेत्र - कोपरगाव

Web Title: Extreme levels of flood danger were announced in the Godavari area.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.